वायफाय अपडेटच्या नावाखाली 'ती' एक फाईल ओपन केली आणि... ?

६६ वर्षांच्या वकिलाला एका छोट्या फाईलने दिला ९ लाखांचा झटका; 'हा' नवा सायबर स्कॅम नक्की काय?
Cyber Fraud Mumbai News in Marathi
फक्त एका 'APK' फाईलने ६६ वर्षीय वकिलाचे ९ लाख रुपये उडवले; मालाडमधील खळबळजनक घटना!
Published on
  • मुंबई: डिजिटल युगात सायबर गुन्हेगार नवनवीन क्लृप्त्या शोधून सर्वसामान्यांना लुटत आहेत. आता चक्क वायफाय अपडेट करण्याच्या बहाण्याने एका वयोवृद्ध वकिलाची तब्बल ९ लाख ९ हजार ७०४ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील मालाड परिसरात उघडकीस आला आहे. आरोपीने पीडित वकिलास मोबाईलवर ‘एपीके’ (APK) फाईल पाठवून त्यांच्या मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस मिळवला आणि बँक खात्यावर डल्ला मारला.

  • याप्रकरणी मालाडमधील बांगुरनगर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि आयटी ॲक्टच्या (IT Act) विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

मालाड येथे राहणारे ६६ वर्षीय तक्रारदार हे एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले असून, सध्या एका लॉ फर्ममध्ये वकील म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घरी एका नामांकित खाजगी कंपनीचे डीटीएच टीव्ही आणि वायफाय कनेक्शन आहे.

  • २३ मे रोजी त्यांच्या मोबाईलवर एक आकर्षक ऑफरचा मेसेज आला होता. त्यांनी ती ऑफर घेण्याचे ठरवले. त्याच दिवशी कंपनीचा एक कर्मचारी त्यांच्या घरी आला आणि त्याने नवीन मोडेम व राऊटर बसवून नवीन 'वायफाय आयपी टीव्ही कनेक्शन' सुरू करून दिले. मात्र, हे सर्व केल्यानंतर वकिलांच्या लॅपटॉपवर वायफाय कनेक्ट होत नव्हते.

Cyber Fraud Mumbai News in Marathi
तुमच्या मोबाईलवर 'APK' फाईल आलीय? सावधान!
  • लॅपटॉप कनेक्ट होत नसल्याने वकिलांनी कर्मचाऱ्याकडे तक्रार केली. त्यावर, "तुमचे एअर फायबर अपग्रेड नसल्यामुळे ही समस्या येत आहे," असे कर्मचाऱ्याने सांगितले. सायबर ठगाने याच संधीचा फायदा घेतला आणि वकिलांच्या मोबाईलवर एक 'APK' फाईल पाठवली.

  • कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून वकिलांनी ती फाईल मोबाईलमध्ये ओपन केली आणि वायफाय अपग्रेड करण्याची विनंती पाठविली. यानंतर मोबाईलवर सुमारे तासभर 'अपडेटिंग' सुरू होते. याच दरम्यान मोबाईलची बॅटरी संपल्याने त्यांचा फोन बंद पडला.

  • काही वेळानंतर जेव्हा वकिलांनी आपला मोबाईल चार्ज करून सुरू केला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. मोबाईल सुरू होताच त्यांना बँकेचे अनेक मेसेजेस आले होते. अज्ञात भामट्याने त्या 'APK' फाईलच्या माध्यमातून वकिलांच्या मोबाईलचा संपूर्ण ॲक्सेस (नियंत्रण) मिळवला होता. त्याद्वारे आरोपीने त्यांच्या बँक खात्यासह डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून तब्बल ९,०९,७०४ रुपयांचे ऑनलाईन व्यवहार करून रक्कम लंपास केली होती.

  • आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वकिलांनी तातडीने सायबर हेल्पलाईन आणि बांगुरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • महत्त्वाची बाब म्हणजे, ही घटना घडली त्याच दिवशी घरी तंत्रज्ञ आला असल्याने, या गुन्ह्यात कंपनीच्याच काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता तक्रारदार वकिलांनी व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने पोलीस संबंधित कर्मचाऱ्यांची आणि वकिलांना कॉल करणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी करत आहेत.

Cyber Fraud Mumbai News in Marathi
Crime News : बनावट ‘APK’ फाईलद्वारे मोबाईल हॅक, अडीच लाखांची फसवणूक

या घटनेच्या पार्श्वभूमीवर सायबर तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:

  • अनोळखी APK फाईल डाऊनलोड करू नका: व्हॉट्सॲप किंवा मेसेजवर आलेल्या कोणत्याही अज्ञात लिंक किंवा '.apk' फाईल्सवर क्लिक करू नका. यामुळे तुमच्या फोनचा रिमोट ॲक्सेस हॅकर्सना मिळतो.

  • ॲप्स नेहमी सुरक्षित स्त्रोतावरूनच घ्या: मोबाईलमध्ये कोणतेही ॲप डाऊनलोड करायचे असल्यास केवळ 'Google Play Store' किंवा 'Apple App Store' चाच वापर करा.

  • बँकेचे तपशील शेअर करू नका: ओटीपी (OTP), बँक खाते क्रमांक, डेबिट/क्रेडिट कार्डचा पिन किंवा सीव्हीव्ही (CVV) कोणासोबतही शेअर करू नका.

  • फसवणूक झाल्यास त्वरित संपर्क करा: सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

Banco News
www.banco.news