तुमच्या मोबाईलवर 'APK' फाईल आलीय? सावधान!

झारखंड ते मुंबई व्हाया सिलिगुडी; सायबर पोलिसांचा 'त्या' तिघांना फिल्मी स्टाईलने घेराव.
Mumbai Police arrest Jharkhand gang for gas bill APK scam
सावधान! 'गॅस कनेक्शन'च्या नावाखाली फसवणूक करणारी झारखंडची टोळी गजाआड; मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई
Published on

मुंबई: गॅस पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून, मोबाईलवर 'एपीके' (APK) फाईल पाठवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या झारखंडच्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी झारखंडमधून तिघांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकी घटना काय?

मुंबईतील एका ज्येष्ठ नागरिकाला जानेवारी महिन्यात त्यांच्या मोबाईलवर एक संदेश (Message) प्राप्त झाला होता. "तुमचा गॅस पुरवठा तातडीने बंद केला जाणार आहे," अशी भीती या मेसेजद्वारे दाखवण्यात आली होती. घाबरलेल्या तक्रारदाराने मेसेजखाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता, समोरच्या व्यक्तीने आपण 'महानगर गॅस लिमिटेड' (MGL) चा अधिकारी बोलत असल्याचे भासवले.

Mumbai Police arrest Jharkhand gang for gas bill APK scam
Crime News : बनावट ‘APK’ फाईलद्वारे मोबाईल हॅक, अडीच लाखांची फसवणूक

संबंधित भामट्याने "तुमचे कनेक्शन अनब्लॉक करायचे असेल तर एक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल," असे सांगून तक्रारदाराला व्हॉट्सॲपवर एक APK फाईल पाठवली. ही फाईल डाऊनलोड करून त्यामध्ये आपली वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती भरताच, काही वेळातच तक्रारदाराच्या खात्यातून २ लाख ३५ हजार रुपये लंपास करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

असा लागला छडा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तपासाची चक्रे फिरवत असताना पोलिसांना आरोपी झारखंडमध्ये असल्याचे धागेदोरे मिळाले.

  • गावकऱ्यांचा विरोध: सायबर पोलिसांचे पथक जेव्हा झारखंडमधील संबंधित गावात पोहोचले, तेव्हा तिथे आरोपींना वाचवण्यासाठी अचानक गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले. या गोंधळाचा फायदा घेत मुख्य आरोपी आरिफ अन्सारी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.

  • रेल्वे स्थानकावर सापळा: पोलीस पथकाने आपला पिच्छा सोडला नाही. आरोपी सिलिगुडी रेल्वे स्थानकावर असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी तिथे सापळा रचून तिघांच्या मुसक्या आवळल्या.

अटक करण्यात आलेले आरोपी:

१. मोहहमद आरिफ अन्सारी

२. शेख बेलाल

३. मेहबूब आलम

न्यायालयाने या तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने आणखी किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे, याचा तपास आता सायबर पोलीस करत आहेत.

Mumbai Police arrest Jharkhand gang for gas bill APK scam
Digital Robbery: गॅस बिल थकल्याची भीती दाखवून डॉक्टरची १० लाखांची लूट

सायबर पोलिसांचे आवाहन:

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेली APK फाईल डाऊनलोड करू नका.

  • गॅस बिल किंवा वीज बिल भरण्यासाठी अधिकृत ॲप्स किंवा वेबसाईटचाच वापर करा.

  • असा मेसेज आल्यास घाबरून न जाता थेट संबंधित कंपनीच्या अधिकृत कस्टमर केअर नंबरवर संपर्क साधा.

  • सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या क्रमांकावर तक्रार नोंदवा.

Banco News
www.banco.news