फक्त ५ हजारासाठी जेल? कोल्हापुरात ४० कोटींचा स्कॅम उघड

सायबर पोलिसांचा सर्वात मोठा खुलासा; १९ खाती अन् देशभरातून ४५ गुन्हे दाखल, गेम काय आहे? वाचा.
Kolhapur Marathi News Bank account fraud
काय आहे सायबर विश्वातील 'मनी म्यूल'चा खेळ? ज्यामुळे तुमचेच खाते तुम्हालाच जेलमध्ये पाठवू शकते!
Published on
  • कोल्हापूर : "घरबसल्या महिना ५ ते १० हजार रुपये कमवा, तुम्हाला फक्त आमच्या सांगण्यावरून तुमच्या बँक खात्यात पैसे घ्यायचे आहेत आणि ते पुढे पाठवायचे आहेत..." जर तुम्हालाही कोणी अशी ऑफर दिली असेल, तर सावधान! केवळ काही हजारांच्या कमिशनच्या आमिषापोटी तुम्ही 'मनी म्यूल' (Money Mule) होऊन थेट पोलिसांच्या कोठडीत पोहोचू शकता. सायबर गुन्हेगार सध्या सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांना लक्ष्य करून त्यांच्या बँक खात्यांचा वापर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांसाठी करत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.

एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १९ म्यूल खाती (Mule Account) शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून, या खात्यांद्वारे देशभरात ४० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे!

काय आहे हा 'मनी म्यूल' प्रकार?

सायबर गुन्हेगार जेव्हा सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात, तेव्हा ते चोरलेले पैसे स्वतःच्या बँक खात्यात घेत नाहीत. कारण असे केल्यास पोलीस त्यांना थेट पकडू शकतात. पोलिसांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी हे गुन्हेगार निरक्षर, गरीब किंवा गरजू लोकांचा शोध घेतात.

त्यांना पैशांचे आमिष दाखवून किंवा 'वर्क फ्रॉम होम' नोकरीचे नाव देऊन त्यांची बँक खाती, एटीएम कार्ड आणि पासबुक स्वतःच्या ताब्यात घेतात. या खात्यांना सायबर जगतात 'म्यूल अकाउंट्स' (Mule Accounts) म्हटले जाते. फसवणुकीची रक्कम या खात्यांमध्ये जमा केली जाते आणि तिथून ती दुसऱ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करून गायब केली जाते. यामुळे गुन्ह्याचा मूळ सूत्रधार (स्कॅमर) मोकाट राहतो आणि बँक खातेधारक गोत्यात येतो.

Kolhapur Marathi News Bank account fraud
सोशल मीडियावर नवा सायबर सापळा: ‘म्यूल’ बँक खाते भाड्याने

सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे:

जिल्ह्यात जी १९ म्यूल खाती सापडली आहेत, त्यांच्याविरुद्ध देशभरातून तब्बल ४५ तक्रारी दाखल आहेत. या सर्व तक्रारींमधील फसवणुकीची एकूण रक्कम तब्बल ४० कोटी रुपये इतकी मोठी आहे. पोलीस जेव्हा पीडित व्यक्तीच्या पैशांचा माग काढत बँक खातेदारापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्या खातेदाराला या गुन्ह्याची काहीच कल्पना नसते. त्यामुळे मूळ आरोपीचा शोध घेणे सायबर पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे.

सायबर गुन्हेगार सहसा खेड्यातील निरक्षर व्यक्ती, विद्यार्थी, नोकरीच्या शोधात असलेले तरुण, रिक्षा व्यावसायिक, झोपडपट्टी परिसरातील नागरिक आणि महिला बचत गटाचे सदस्य यांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढतात.

या खात्यांचा वापर कशासाठी होतो?

म्यूल अकाउंट्सचा वापर प्रामुख्याने खालील काळ्या धंद्यांसाठी केला जातो:

  • मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering): काळा पैसा पांढरा करणे किंवा चोरीचा पैसा पोलिसांच्या नजरेत येऊ न देणे.

  • सायबर फ्रॉड: फिशिंग लिंक्स, लॉटरी लागल्याचे आमिष आणि 'टास्क बेस' गुंतवणूक फसवणुकीतून आलेले पैसे लपवणे.

मनी म्यूल घोटाळ्यांपासून स्वतःचा बचाव कसा कराल?

सायबर गुन्हेगारांच्या विळख्यातून स्वतःला आणि स्वतःचे बँक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिसांनी खालील नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे:

  • खाते वापरू देऊ नका: कोणालाही तुमचे बँक खाते पैसे स्वीकारण्यासाठी किंवा पाठविण्यासाठी वापरू देऊ नका.

  • गोपनीय माहिती जपा: तुमचा ओटीपी (OTP), सीव्हिव्ही (CVV), पासवर्ड किंवा इंटरनेट बँकिंगची लॉगिन माहिती कोणाशीही शेअर करू नका.

  • किमती ऐवज देऊ नका: इतरांच्या सांगण्यावरून बँक खाते उघडू नका, तसेच तुमचे डेबिट कार्ड, पासबुक किंवा मोबाईल बँकिंग अ‍ॅपचा पासवर्ड कोणालाही देऊ नका.

  • पासवर्ड बदला: तुमच्या मोबाईल बँकिंगचा पासवर्ड नियमितपणे बदलत राहा.

  • अनोळखी संवाद टाळा: सोशल मीडिया किंवा फोनवर अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या 'कमाईच्या' ऑफर्सना बळी पडू नका. अवास्तव ऑफर्स आणि मोठ्या सवलतींपासून सावध राहा.

Kolhapur Marathi News Bank account fraud
मनी लॉन्डरिंग, फसवणूक रोखण्यासाठी ‘म्यूलहंटर.एआय’

"सर्वसामान्य नागरिकांनी अशा सायबर गुन्हेगारांपासून अत्यंत सावध राहावे. आपले बँक खाते अथवा त्याचे डिटेल्स कोणालाही वापरण्यास देऊ नयेत. पैशाच्या किरकोळ आमिषापोटी स्वतःचे मोठे नुकसान करून घेऊ नका आणि फसवणुकीला बळी पडू नका." - निलोत्पल, जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर

Banco News
www.banco.news