करदात्यांना द्यावे लागणार दोन पत्ते; आयकर विभागाचा नवा नियम काय आहे?

करदात्यांसोबतचा संवाद अधिक अचूक करण्यासाठी आयकर विभागाचा मोठा निर्णय.
E-filing portal address update
आयकर भरताना आता दोन पत्ते का द्यावे लागणार? नक्की काय आहे आयकर विभागाचा नवा प्लॅन?
Published on

मुंबई: आयकर विभागाने (Income Tax Department) मूल्यांकन वर्ष २०२६-२७ (AY 2026-27) साठी प्राप्तीकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याच्या प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या नियमांनुसार, आता करदात्यांना आयटीआर दाखल करताना त्यांच्या प्राथमिक पत्त्यासोबत (Primary Address) एक अतिरिक्त किंवा दुय्यम पत्ता (Additional Address) देणे आवश्यक असणार आहे. या नव्या बदलासाठी आयकर विभागाने ITR-1 ते ITR-7 पर्यंतच्या सर्व रिटर्न फॉर्म्समध्ये नवीन रकाना (Column) समाविष्ट केला आहे.

हा बदल नेमका काय आहे, तो कोणाला लागू होतो आणि करदात्यांनी काय काळजी घ्यावी, याचा सविस्तर आढावा घेणारे हे विश्लेषण.

१. नवीन नियम नेमका कोणाला लागू?

हा बदल कोणत्याही एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नसून सर्व करदात्यांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. यामध्ये खालील घटकांचा समावेश होतो:

  • पगारदार कर्मचारी आणि व्यावसायिक (ITR-1 आणि ITR-2 वापरणारे)

  • उद्योजक आणि भागीदारी संस्था (Partnership Firms/LLPs)

  • कंपन्या आणि ट्रस्ट (Companies & Trusts)

थोडक्यात सांगायचे तर, तुम्ही आयटीआरचा कोणताही फॉर्म (ITR-1 ते ITR-7) वापरत असाल, तर तुम्हाला या नवीन रकान्यात माहिती भरणे आवश्यक असेल.

E-filing portal address update
ITR भरताना 'हा' रकाना विसरू नका; अन्यथा येईल प्राप्तिकर विभागाची नोटीस!

२. दोन पत्ते मागण्यामागचे कारण काय?

आयकर विभागाने या नवीन बदलाबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, कर क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, यामागे खालील प्रमुख उद्देश असू शकतात:

  • संवाद सुधारणे: करदात्यांशी टपाल किंवा नोटीसद्वारे संपर्क साधणे सोपे जावे.

  • अचूक नोंद ठेवणे: अनेकदा करदाते नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर करतात. अशा वेळी त्यांचा कायमचा पत्ता आणि तात्पुरता पत्ता दोन्ही विभागाकडे असावेत, जेणेकरून भविष्यातील पत्रव्यवहार खंडित होणार नाही.

  • व्यावसायिक आणि वैयक्तिक फरक: ज्यांचे घर आणि कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी आहे, त्यांना आता दोन्ही पत्ते स्वतंत्रपणे नोंदवता येतील.

आयकर कायद्यात 'दुय्यम पत्ता' (Secondary Address) याची कोणतीही स्वतंत्र कायदेशीर व्याख्या दिलेली नाही. त्यामुळे एखाद्या करदात्याचा एकच पत्ता असेल आणि ई-फायलिंग पोर्टलने परवानगी दिली, तर ते प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही रकान्यांमध्ये एकच पत्ता नमूद करू शकतात.

३. आयटीआर दाखल करताना काय काळजी घ्यावी?

पत्ता बदलण्याच्या या नवीन सुविधेचा वापर करताना करदात्यांनी खालील गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे:

  • माहितीची अचूकता: पत्ता लिहिताना घर/फ्लॅट क्रमांक, इमारत, रस्ता, परिसर, शहर, राज्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिन कोड (PIN Code) अत्यंत अचूक असावा.

  • चुका दुरुस्त करण्याची संधी: जर आयटीआर दाखल केल्यानंतर पत्त्यामध्ये काही चूक झाल्याचे लक्षात आले, तर आयकर कायद्याच्या कलम १३९(५) अंतर्गत विहित मुदतीत सुधारित विवरणपत्र (Revised Return) दाखल करून ती दुरुस्त करता येऊ शकते.

  • प्रोफाइल अपडेट ठेवा: करदाते त्यांच्या ई-फायलिंग पोर्टलवरील प्रोफाइलमध्ये जाऊनही आपला पत्ता अपडेट करू शकतात.

E-filing portal address update
ITR Filing 2026: ३१ जुलैपर्यंत आयटीआर न भरल्यास काय होईल?

४. अचूक पत्ता का महत्त्वाचा आहे?

आयकर विभागाकडून येणाऱ्या स्क्रुटिनी नोटिसी, रिफंडचे दावे, किंवा इतर कायदेशीर सूचना वेळेत मिळण्यासाठी अचूक पत्ता असणे अनिवार्य आहे. चुकीच्या पत्त्यामुळे महत्त्वाचा पत्रव्यवहार वेळेत न मिळाल्यास करदात्यांना नाहक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे यंदाचा आयटीआर भरताना 'वैयक्तिक माहिती' (Personal Information) हा विभाग अत्यंत काळजीपूर्वक तपासून घेणे गरजेचे आहे.

Banco News
www.banco.news