

पलूस : क्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आर्थिक प्रगतीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत एकूण व्यवसाय १०१ कोटी रुपयांहून अधिक केला आहे. तसेच, अहवाल वर्षासाठी सभासदांना ११ टक्के लाभांश (डिव्हिडंड) जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील यांनी ९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.
पलूस येथील मुख्य कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या सभेत अध्यक्ष धन्यकुमार पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि हितचिंतक यांच्या विश्वासामुळे संस्थेने सातत्याने प्रगती साधली असून भविष्यातही अधिक सक्षम आर्थिक सेवा देण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील
संस्थेचे संस्थापक शरद लाड यांनीही संस्थेच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत, सभासदांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे सांगितले. अल्पावधीतच सहकार क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या क्रांती अर्बनचा विकासाचा आलेख भविष्यातही अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सभेचे प्रास्ताविक व स्वागत उपाध्यक्ष प्रथमेश दिवटे यांनी केले. संस्थेचा वार्षिक अहवाल अध्यक्ष धन्यकुमार पाटील यांनी सादर केला, तर नोटीस व ताळेबंदाचे वाचन व्यवस्थापक सागर रेपाळ यांनी केले. सभासदांनी सभेपुढील सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली.
'अ' वर्गासह आर्थिक कामगिरीत उल्लेखनीय वाढ
यंदाच्या आर्थिक वर्षात संस्थेला 'अ' वर्ग प्राप्त झाला आहे. संस्थेकडे सध्या ६० कोटी रुपयांच्या ठेवी, ४३ कोटी रुपयांचे कर्जवाटप असून, एकूण व्यवसाय १०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या भक्कम आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
क्रांती अर्बन ही सहकारअग्रणी आमदार अरुण लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या सहकार, सेवा आणि विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेत विश्वासार्ह आणि पारदर्शक कामकाजाची परंपरा कायम ठेवत आहे.
यावेळी अॅड. सतीश चौगुले, दिलीप जाधव, सुरेश शिंदे, सुरेश देशमुख, जे. आर. पाटील, घनश्याम पोळ, वसंत पाटील, प्रमोद माने, शिवाजी केसरे, संदीप क्षीरसागर, हनमंत मोहिते, संभाजी पाटील, मोहन मोरे, सचिन महाडिक, सुशांत पाटील, रत्नदीप माने, राजेंद्र चौगुले, उदय साळुंखे, तानाजी मोकाशी, विशाल शिंदे तसेच संस्थेचे सभासद, हितचिंतक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विनोद पाणबुडे यांनी मानले.