
कुडित्रे येथील यशवंत सहकारी बँकेची ५१ वी वार्षिक सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी बँकेचे अध्यक्ष महेश पाटील म्हणाले की, बँकेला यावर्षी १ कोटी ६५ लाखांचा नफा झालेला आहे. आगामी काळात मिश्र व्यवसाय ३५० कोटी करण्याचे व दोनशे कोटी ठेवीचे बँकेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. तसेच सभासदांना ११ टक्के लाभांश देणार असल्याचे महेश पाटील यांनी जाहीर केले. व्यासपीठावर उपाध्यक्ष दिलीप खाडे यांची उपस्थिती होती.
महेश पाटील म्हणाले, "बँकेचा निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. बँकेकडे १८० कोटींच्या ठेवी असून ४७ कोटी ठेवी संचालक मंडळाने केल्या. १ कोटी २७ लाख विक्रमी वसूली झाली." अहवालवाचन सीईओ रमेश पाटील यांनी केले, विषय वाचन विकास पाटील यांनी केले. यावेळी आनंदराव पाटील यांनी, सभासद वाढीसाठी परवानगी द्यावी, अशी सूचना केली. ॲड. विजय पाटील, सुरेश रांगोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. उत्तम पाटील, कोगे यांनी व्यवसायात १३ टक्के वाढ व्हावी, अशी सूचना केली. ॲड. विजय पाटील यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापित झाल्याबद्दल सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला.
सभेत ४७ कोटींच्या ठेवी वाढलेल्या नाहीत. नफा चार कोटींनी कमी झाल्याबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर दादासाहेब पाटील यांनी तीन शाखांत कर्ज कमी व ठेवी जादा असल्याचे सांगितले. ज्योत्स्ना पाटील यांनी सूचनांची नोंद घेतली नसल्याचा आरोप केला. पंडित मस्कर यांनी नोकरभरती कायम करावी, अशी मागणी केली. संचालकॲड. प्रकाश देसाई, अमर पाटील यांनी कर्जदार चांगला असेल तरच बँकेला फायदा होईल. नोकरभरती न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगून प्रश्नांना उत्तरे दिली. तोट्यातील तीन शाखांच्या जागा बदला अशा सूचना सभासदांनी केल्या. यावेळी सागर बुरुड, ॲड. बाजीराव शेलार, प्रा. बी. बी. पाटील, श्रीकांत मोळे, मुकुंद पाटील, नामदेव पाटील यांनी विमा, कर्ज, लाभांशाबाबत सूचना मांडल्या. यावेळी संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.