सोने खरेदीत रिझर्व्ह बँकेचा वाढता कल... गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा संकेत

दोन वर्षांत सोन्याच्या किमती दुप्पट; मध्यवर्ती बँकांचा सुवर्ण साठा वाढवण्यामागील अर्थ काय?
Reserve bank of india - Gold rate today
सोने खरेदीत रिझर्व्ह बँकेचा वाढता कल... गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा संकेत
Published on

सोन्या-चांदीच्या किमतींनी गेल्या दोन वर्षांत अक्षरशः उसळी घेतली आहे. विशेषतः सोन्याच्या दरांनी कमी कालावधीत जवळपास दुप्पट मजल मारल्याने केवळ तज्ज्ञच नव्हे, तर सामान्य गुंतवणूकदारही अचंबित झाला आहे. “सोने इतके का वाढते आहे?” हा प्रश्न आज सर्वांच्याच मनात आहे. या प्रश्नाचे एक महत्त्वाचे उत्तर म्हणजे – जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून, त्यात भारताची रिझर्व्ह बँकही अग्रभागी, सोन्याची मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली खरेदी.

जागतिक अनिश्चितता आणि डॉलरची भीती

आजच्या जागतिक परिस्थितीत अस्थिरता हीच एकमेव स्थिर बाब बनली आहे. प्रत्यक्ष युद्धे, व्यापारयुद्ध, चलनयुद्ध, टॅरिफ धोरणे आणि अमेरिकेच्या राजकीय निर्णयांमुळे जागतिक व्यापार व्यवस्थेवर सतत ताण आहे. या साऱ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे अमेरिकी डॉलर – जो आजही जागतिक व्यापारातील प्रमुख चलन आहे.

जर जागतिक पातळीवर डॉलरवरील विश्वास डळमळीत झाला, तर त्याचे पडसाद संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटू शकतात. हीच भीती आज मध्यवर्ती बँकांपासून ते सामान्य गुंतवणूकदारांपर्यंत सर्वांनाच सतावत आहे. परिणामी, एका बाजूला रोकड (डॉलर) आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षित मालमत्ता (सोने) अशी दुहेरी धारणाच आज बाजारात दिसून येते. त्यामुळेच डॉलर आणि सोने – दोन्हीमध्ये एकाच वेळी तेजी दिसत आहे.

रिझर्व्ह बँकेपुढील दुहेरी आव्हान

भारतीय रिझर्व्ह बँकेसमोर आव्हाने अधिक गुंतागुंतीची आहेत. एकीकडे महागाईवर नियंत्रण ठेवणे, दुसरीकडे आर्थिक विकासाला चालना देणे आणि त्याच वेळी रुपयावरील विश्वास अबाधित ठेवणे – ही तिहेरी जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर आहे.

चालू वर्षात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया सुमारे सहा टक्क्यांनी घसरला असून, अलीकडेच त्याने नव्वदीचा नीचांकी स्तरही गाठला. अशा परिस्थितीत देशाच्या परकीय चलन गंगाजळीची स्थिरता राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Reserve bank of india - Gold rate today
मध्यवर्ती बँकांचा सोन्याकडे वाढता ओढा का? जाणून घ्या खरे कारण

किमान राखीव निधी प्रणाली (MRS) आणि सोन्याची भूमिका

१९५६ पासून भारतात चलन छपाईसाठी किमान राखीव निधी प्रणाली (Minimum Reserve System – MRS) वापरात आहे. भारतीय रिझर्व्ह बँक कायदा, १९३४ नुसार, रिझर्व्ह बँकेने जारी केलेले चलन तिच्या गंगाजळीत असलेल्या मालमत्तांद्वारे समर्थित असणे आवश्यक आहे. या मालमत्तांमध्ये सोन्याचे नाणे, सोन्याचे लगड, परकीय चलन, परदेशी व देशांतर्गत रोखे यांचा समावेश होतो.

अमेरिकी डॉलरची उच्चांकी आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गंगाजळीत सोन्याचा वाटा वाढवणे हे अधिक सुरक्षित आणि तर्कसंगत धोरण ठरत आहे.

आर्थिक सुरक्षेचा सुवर्ण कवच

जगातील बहुतांश मध्यवर्ती बँकांच्या परकीय चलन गंगाजळीत डॉलरचे प्रमाण मोठे आहे. मात्र, भविष्यात अमेरिकेची अर्थव्यवस्था डळमळीत झाली किंवा डॉलरचे मूल्य घसरले, तर त्या गंगाजळीचे मूल्यही कमी होऊ शकते. अशा वेळी सोने आणि चांदी हा तोल सावरणारा घटक ठरतो.

इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे की सरकारे बदलली, चलने बाद झाली किंवा नोटबंदी झाली तरी सोन्याचे मूल्य कधीही शून्य झालेले नाही. चलनाचे मूल्य घसरते तेव्हा सोने त्याला प्रतिसंतुलन देत संपत्तीचा तोल राखते. दीर्घकालीन दृष्टीने पाहता, सोन्याचे मूल्य महागाईच्या दराइतके किंवा त्याहून अधिक वाढताना दिसते.

Reserve bank of india - Gold rate today
सोने विक्री आणि प्राप्तिकर कायदा : गुंतवणूकदारांनी नक्की जाणून घ्या

रिझर्व्ह बँकेची विक्रमी सोने खरेदी

या धोरणात्मक विचारातूनच रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षात जवळपास ६० टन सोने खरेदी करून देशाचा सुवर्ण साठा सुमारे ८८० टनांपर्यंत नेला. चालू वर्षात सप्टेंबरपर्यंत तिने सुमारे २६.५ अब्ज डॉलरचे सोने आणि ३.२१ अब्ज डॉलरची चांदी खरेदी केली आहे. ही खरेदी केवळ परताव्यासाठी नव्हे, तर भविष्यकालीन धोक्यांपासून संरक्षण म्हणून करण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांसाठी नेमका संदेश काय?

सोप्या शब्दांत सांगायचे तर, सोने हे आज केवळ सामान्य गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओचेच नव्हे, तर देशाच्या खजिन्याचेही विमा कवच बनले आहे. बाजाराचे आवर्तन अटळ आहे. परताव्याच्या मागे धावण्याचा काळ संपतो आणि स्थिरतेला प्राधान्य देण्याचा काळ येतो. अशा वेळी पोर्टफोलिओमध्ये स्थिरता देणारी मालमत्ता म्हणजे – सोने.

रिझर्व्ह बँकेची वाढती सोने खरेदी हेच स्पष्टपणे सांगते की, अनिश्चित भविष्याच्या पार्श्वभूमीवर आर्थिक सुरक्षिततेसाठी सोने अजूनही अपरिहार्य आहे. सुज्ञ गुंतवणूकदारांनी हा संकेत ओळखणे काळाची गरज आहे.

Banco News
www.banco.news