वाई अर्बन बँकेची दमदार भरारी: ३.९६ कोटींचा नफा, एनपीए शून्य टक्क्यांवर!

१०५ व्या वार्षिक सभेत अध्यक्ष अनिल देव यांचा बँक उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत असल्याचा विश्वास; सामान्य ग्राहकांसाठी ८% दराने गृहकर्ज योजना.
Wai Urban Bank News
वाई अर्बन बँकेची दमदार भरारी
Published on

वाई: दि वाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवत ३ कोटी ९६ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बँकेने आपला नक्त एनपीए (Net NPA) शून्य टक्क्यांवर आणण्यात यश मिळवले आहे. आगामी काळात जुन्या अनुत्पादित कर्ज (एनपीए) खात्यांमधून होणारी वसुली बँकेचा नफा अधिक वाढवेल, ज्यामुळे बँकेचे भविष्य अत्यंत उज्वल आहे, असा ठाम विश्वास बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांनी व्यक्त केला.

बँकेची १०५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाई येथील साठे मंगल कार्यालयात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि सभासदांच्या उत्साही सहभागात पार पडली. यावेळी अध्यक्षीय भाषणात अनिल देव यांनी बँकेच्या आगामी धोरणांची माहिती दिली.

वार्षिक सभेतील मुख्य मुद्दे आणि आर्थिक वाटचाल:

  • संचित तोटा भरून काढण्याचा संकल्प: चालू आर्थिक वर्षात बँकेचा रु. ३० कोटींचा संचित तोटा पूर्णपणे भरून काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

  • थकीत कर्ज वसुलीस गती: ३१ मार्च २०२६ अखेर १०८ कोटी रुपयांचे जुने एनपीए शिल्लक होते. त्यापैकी एकट्या ऑगस्ट महिन्याअखेर जवळपास ५ कोटी रुपयांची वसुली करण्यात यशस्वी ठरलो आहोत.

  • कर्जदारांसाठी दैनंदिन ठेवींची योजना: कर्जदारांच्या खात्यात दरमहा दैनंदिन ठेवीची रक्कम जमा करण्याचे धोरण लागू केल्याने कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला असून, बँकेचा व्यवसाय वाढीस मदत होत आहे.

  • कमी व्याजदरात गृहकर्ज योजना: केवळ नफा कमावणे हा उद्देश न ठेवता सामान्य ग्राहकांना हक्काचे घर घेता यावे, यासाठी बँकेने अवघ्या ८ टक्के इतक्या अल्प व्याजदराने 'घरबांधणी कर्ज योजना' सुरू केली आहे.

Wai Urban Bank News
वाई अर्बन बँकेला मिळाला लेखापरिक्षण ‘अ’ वर्गाचा बहुमान!

सभेत बोलताना बँकेचे संचालक विवेक पटवर्धन यांनी जुन्या कर्ज वसुलीतील व्यावहारिक अडचणींवर प्रकाश टाकला. काही जुन्या थकीत कर्ज खात्यांमध्ये मालमत्तांचे मूल्यांकन तत्कालीन काळात जादा दाखवले गेले होते. मात्र, सध्याच्या बाजारभावानुसार या मालमत्तांना योग्य दर मिळत नसून खरेदीदारही मिळत नाहीत. लिलाव न झालेल्या मालमत्ता बँकेच्या नावावर करून घेण्यासाठी ६ टक्के दराने लाखो रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, थकीत वसुलीसाठी मागील संचालक मंडळाच्या गेल्या वर्षात २ ते ३ बैठका घेऊन त्यांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेच्या सुरुवातीला मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे यांनी २०२५-२६ चा आर्थिक अहवाल, लेखापरीक्षित पत्रके, दोष दुरुस्ती अहवाल, अंदाजपत्रक आणि वैधानिक लेखापरीक्षकांच्या नियुक्तीचा विषय सभेपुढे मांडला. या सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.

बँकेच्या नवीन इमारतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, बँक आपल्या स्वतःच्या जागेतच भविष्यात सुसज्ज इमारत उभारणार असल्याचे संचालक पटवर्धन यांनी स्पष्ट केले. माजी संचालक मिलिंद भंडारे, विनय पोरे व इतर सभासदांच्या शंकांना व्यवस्थापनाने समाधानकारक उत्तरे दिली.

बँकेच्या थकीत व अनियमित कर्जांबाबत मागील संचालक मंडळाविरुद्ध सहकार आयुक्तांनी केलेल्या चौकशीचे प्रकरण सध्या सहकार मंत्र्यांकडे प्रलंबित आहे. यावर बोलताना माजी अध्यक्ष डॉ. मधुसूदन मुजुमदार यांनी एक महत्त्वपूर्ण ठराव मांडला: "सहकार मंत्र्यांनी निर्णय देताना कोणत्याही गैरव्यवहाराला पाठीशी न घालता, बँकेच्या व सामान्य सभासदांच्या हिताचे रक्षण करणाराच निर्णय द्यावा." या ठरावाला प्रदीप चोरगे, बाळासाहेब कोठावळे, मिलिंद पाटणकर, डॉ. प्रकाश पोरे, डॉ. मकरंद पोरे यांच्यासह उपस्थित सभासदांनी जोरदार अनुमोदन दिले.

Wai Urban Bank News
१०५ वर्षांची परंपरा जपत! वाई अर्बन बँकेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न!

सभेचा प्रारंभ संचालक काशिनाथ शेलार यांच्या दुखवटा ठरावाने झाला. उपसरव्यवस्थापक आनंद पटवर्धन यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले. सहायक सरव्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक महेश राजेमहाडीक यांनी आभार मानले. सौ. मनीषा घैसास यांच्या 'वंदे मातरम' गायनाने सभेची सांगता झाली.

या सभेस बँकेचे संचालक डाँ. शेखर कांबळे, माधव कान्हेरे, रमेश ओसवाल, मकरंद मुळये, प्रीतम भूतकर, स्वप्नील जाधव, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, संचालिका अँड. सुनिती गोवित्रीकर, नगरसेविका सौ. ज्योती गांधी, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे, अनंत जोशी, पालक अधिकारी जनार्दन शिंदे, वैधानिक लेखापरिक्षक सीए. शिरिष गोडबोले, सीए राजेंद्र गाडगीळ, बँकेचे माजी उपाध्यक्ष सुनील शिंदें, राजेंद्र चावलानी, पाचगणीतील डाँ. सुधीर बोधे, नरहरी महाबळेश्वरकर, बँकेचे माजी संचालक विवेक भोसले, स्वरूप मुळे, माजी संचालिका सौ. अनुराधा जोशी, सौ. अंजली शिवदे, सौ. गीता कोठावळे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन फरांदे, डाँ. म. भा. फणसळकर, विजयकुमार मुळीक, मिलिंद पुरोहित, आनंद शेलार, चंद्रकांत खोपडे, प्रशांत नागपुरकर आदी व स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यावसायिक आणि बँकेचे भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banco News
www.banco.news