यूपीआयचा दशकभरात विक्रमी विस्तार

यूपीआय 10 वर्षे पूर्ण : दहा वर्षांत व्यवहारांची संख्या १३ हजार पटींनी वाढली; जुलै २०२६ मध्ये २,३६६ कोटी व्यवहारांचा नवा विक्रम
UPI भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा कणा
UPI भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा कणा
Published on

नवी दिल्ली : भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा कणा बनलेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसने (UPI) गेल्या दशकभरात मोठी झेप घेतली आहे. २५ ऑगस्ट २०१६ रोजी सुरू झालेले यूपीआय आज 10 वर्षाचे झाले. या 10 वर्षात रिअल-टाइम डिजिटल व्यवहारांना चालना देत भारताच्या पेमेंट व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला आहे.

UPI भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा कणा
डिजिटल व्यवहारांमध्ये ८५ टक्के वाटा यूपीआयचा : आर बीआय गव्हर्नर

व्यवहारांत १३ हजार पटींची वाढ

अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, २०१६-१७ मध्ये यूपीआयवर १७.८ कोटी व्यवहार झाले होते. २०२५-२६ मध्ये ही संख्या २४,१६२ कोटींपेक्षा अधिक होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दशकभरात यूपीआय व्यवहारांच्या संख्येत तब्बल १३ हजार पटींनी वाढ झाली आहे.

व्यवहारांचे मूल्यही वाढले

२०१६-१७ मध्ये यूपीआयद्वारे सुमारे ₹७,००० कोटींचे व्यवहार झाले होते. २०२५-२६ मध्ये हे मूल्य ४,००० पटींहून अधिक वाढून अंदाजे ₹३१४ लाख कोटींवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

UPI भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा कणा
आता एटीएमकार्डशिवाय पैसे काढता येणार!

डिजिटल समावेशनाला चालना

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) विकसित केलेले यूपीआय हे भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे प्रमुख आधारस्तंभ बनले आहे. व्यक्ती-ते-व्यक्ती (P2P) आणि व्यक्ती-ते-व्यापारी (P2M) व्यवहार एका प्लॅटफॉर्मवरून करता येत असल्याने डिजिटल पेमेंट अधिक सुलभ झाले आहे.

यूपीआयच्या वाढत्या वापरामुळे डिजिटल व्यवहारांना वेग मिळण्यासोबतच आर्थिक समावेशनालाही मोठी चालना मिळाली आहे.

महिन्यागणिक नवे विक्रम

मे २०२६ मध्ये यूपीआय व्यवहारांनी प्रथमच एका महिन्यात २,३२० कोटींचा टप्पा गाठला. त्यानंतर जुलै २०२६ मध्ये २,३६६ कोटी व्यवहारांची नोंद झाली. हा यूपीआयच्या दशकभराच्या इतिहासातील एका महिन्यातील सर्वाधिक व्यवहारांचा आकडा ठरला.

बँकांची भागीदारी वाढली

यूपीआयच्या पहिल्या वर्षात म्हणजेच २०१६-१७ मध्ये केवळ ४४ बँका सहभागी होत्या. २०२५-२६ पर्यंत ही संख्या वाढून ७०३ झाली आहे. बँकांचा वाढता सहभाग आणि ग्राहकांचा वाढता वापर यामुळे यूपीआयचा विस्तार वेगाने झाला आहे.

डिजिटल अर्थव्यवस्थेचा आधार

दशकभरात यूपीआयने भारतातील पेमेंटची पद्धत बदलून टाकली आहे. सुलभ, जलद आणि रिअल-टाइम व्यवहारांमुळे यूपीआय आता भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे.

Banco News
www.banco.news