
शहादा येथील दि शहादा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.ची ७६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच महावीर भवन, शहादा, जि.नंदुरबार येथे उत्साहात संपन्न झाली. सभेस बँकेचे प्रेसिडेंट श्री. प्रकाशचंद आसकरण जैन, व्हाईस प्रेसिडेंट श्री.गौतमचंद अनोपचंद जैन आणि सर्व संचालक मंडळ तसेच व्यवस्थापन मंडळ आणि सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रेसिडेंट जैन यांनी सभासदांना ७ टक्के लाभांश जाहीर केला.
प्रेसिडेंट जैन म्हणाले, "बँकेला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही “अ” वर्ग मिळालेला आहे. ३१ मार्च २०२५ अखेर लेखापरीक्षणानुसार आपल्या बँकेच्या एकूण ठेवी १८१ कोटी ८६ लाख, कर्जे १३२ कोटी ६० लाख, स्वनिधी २१ कोटी २७ लाख, गुंतवणूक ५९ कोटी ३८ लाख, खेळते भांडवल २१५ कोटी ३६ लाख असून बँकेने १ कोटी १५ लाख रुपये आयकर भरलेला आहे. सर्व खर्च, तरतूद आणि आयकर वजा जाता बँकेला १ कोटी ५१ लाख रुपये निव्वळ नफा झाला आहे. यंदा आपल्या बँकेच्या निव्वळ एनपीएचे प्रमाण ०.८५ टक्के असून तो शून्य टक्क्यापर्यंत आणण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे."
यासोबतच बँकेच्या आजतागायत प्रगतीवर दृष्टीक्षेप टाकला आणि सर्व सभासदांना आवाहन केले की, त्यांनी स्वत: आणि आपले नातेवाईक यांना जास्तीत जास्त ठेवी आपल्या बँकेत ठेवण्यास सांगाव्यात आणि बँकेला २०० कोटींचा ठेवींचा टप्पा गाठण्यासाठी सहकार्य करावे.
अहवाल वर्षात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी बांधवांचा आणि बँकेच्या एकूण १२ शाखांपैकी उत्तम कामगिरी करणाऱ्या शाखांना यावेळी विविध पुरस्कर प्रदान करण्यात आले. अहवाल सालात जास्त नफा मिळवणाऱ्या तळोदा आणि नंदुरबार शाखेचा, जास्त ठेवी वाढविल्याबद्दल मुख्य शाखा आणि मार्केट यार्ड शाखा, कर्ज वाटपमध्ये अक्कलकुवा शाखा आणि पिंपळनेर शाखा आणि सर्वात जास्त डिजिटल व्यवहार या श्रेणीमध्ये धडगाव आणि म्हसावद शाखेचा सन्मान करण्यात आला.
विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. बँकेच्या संचालक मंडळाने ठरवाना मंजुरी दिल्याबद्दल उपस्थित सर्व सभासदांचे आभार व्यक्त केले. यावेळी सभासदांमधून श्री.सुरेश जव्हेरी, श्री.संपतलाल कोठारी आणि श्री.संजय वाणी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रस्तावना बँकेचे जनरल मॅनेजर श्री.विजयकुमार राखेचा यांनी केली. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री.पुरुषोत्तम शिंपी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी असि.जनरल मॅनेजर श्री.जितेंद्र जैन आणि मुख्य कार्यालय आणि सर्व शाखांमधील अधिकारी आणि कर्मचारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.