सांगली अर्बन बँकेची ९० वी वार्षिक सभा उत्साहात; ८ टक्के लाभांश जाहीर

'व्हिजन २०३५' अंतर्गत १० हजार कोटींच्या उलाढालीचा संकल्प
Sangli Urban Bank 90th AGM update
सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक वार्षिक सभा
Published on

सांगली : सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची ९० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १४ ऑगस्ट) धामणी रोड, विश्रामबाग येथील खरे क्लब हाऊस येथे अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बँकेचे अध्यक्ष सीए श्रीपाद खिरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सभासदांना ८ टक्के लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच आगामी काळात बँकेची एकूण आर्थिक उलाढाल १० हजार कोटी रुपयांपर्यंत नेणे आणि शाखा विस्तार करणे, असा संकल्प या सभेत सर्वानुमते करण्यात आला.

सभेच्या सुरुवातीला बँकेचे संस्थापक स्व. अण्णा गोडबोले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तत्पूर्वी, सभासदांसाठी विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तज्ज्ञ श्री. सुजित जोशी यांनी 'सायबर सिक्युरिटी' या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले आणि सभासदांच्या शंकांचे निरसन केले. संदीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय करून दिला.

अध्यक्षीय भाषणात सीए श्रीपाद खिरे म्हणाले की, बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम व सुरक्षित आहे. गत आर्थिक वर्षात बँकेचा एकत्रित व्यवसाय २,३२८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या ठेवी ९.३४ टक्क्यांनी वाढून १,३९६ कोटी रुपये झाल्या आहेत, तर कर्जवितरणात २२.५१ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ होऊन ते ९३२ कोटी रुपयांवर कर्जवाटप पोहोचले आहे. या वर्षात बँकेला ६.६५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

Sangli Urban Bank 90th AGM update
सांगली अर्बन बँक: विश्रामबाग शाखेचे नूतनीकरण व विस्तारित लॉकर सेवेचे उद्घाटन

व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ यांनी बँकेच्या आर्थिक स्थैर्याचा पट मांडला. ते म्हणाले, “नोटाबंदी आणि कोरोनासारख्या खडतर काळातही व्यवस्थापनाने बँकेला सक्षमपणे सावरले आहे. यावर्षी सभासदांना ८ टक्के लाभांश दिला जात असून, भविष्यात हा लाभांश दोन अंकी (१० टक्क्यांपेक्षा जास्त) देण्याचे उद्दिष्ट आहे. कर्जवाढ करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.” तसेच बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर 'व्हिजन २०३५' चा आराखडा आणि शाखा नूतनीकरणाची योजना तयार करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

सभेत चर्चेदरम्यान सभासद महावीर खोत यांनी गत दहा वर्षांत गणेशराव गाडगीळ आणि संचालक मंडळाने केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले. बँकेची स्थिती भक्कम झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत, आगामी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन त्यांनी केले. चर्चेत संजय जोशी, जयपाल चौगुले, संतोष लकडे, सुनील माणकापुरे, श्रीकृष्ण माळी, भरत देशमुख आदी सभासदांनी सहभाग नोंदवून संचालक मंडळाच्या कामगिरीचे अभिनंदन केले.

Sangli Urban Bank 90th AGM update
सांगली अर्बन बँकेची गांधी चौक शाखा आता 'हायटेक'

सभेचे नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक यांनी केले, तर स्वप्नील जोशी यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. या प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाखांचा व विविध खातेदारांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या सभेस बँकेचे उपाध्यक्ष संजय पाटील, संचालक सीए अनंत मानवी, विश्वास चितळे, हणमंतराव पाटील, संजय धामणगावकर, रणजित चव्हाण, कालिदास हरिदास, सागर घोंगडे, सतीश मालू, स्वाती करंदीकर, अश्विनी आठवले, रवींद्र भाकरे, मनोज कोरडे, सागर फडके, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर यांच्यासह बँकेचे संचालक, अधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banco News
www.banco.news