

सांगली : सांगली अर्बन को-ऑप. बँक लि., सांगलीच्या विश्रामबाग शाखेच्या नूतनीकृत वास्तूचे आणि विस्तारित लॉकर सेवेचा भव्य उद्घाटन समारंभ दि. ६ ऑगस्ट रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. स्थानिक आमदार सुधीर (दादा) गाडगीळ यांच्या शुभहस्ते नूतनीकृत शाखेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक डॉ. प्रियदर्शन चितळे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि बँकेचे संस्थापक स्व. अण्णा गोडबोले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. याप्रसंगी हर्षल वैद्य यांनी सहकार गीत सादर केले.
बँकेचे संचालक संजय धामणगांवकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. "बदलत्या बँकिंग क्षेत्रात ग्राहकांना अधिक आधुनिक, तत्पर, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे तसेच ग्राहकांचा अनेक वर्षांचा विश्वास अधिक दृढ करणे, हा या शाखा नूतनीकरण व लॉकर विस्तारामागील मुख्य उद्देश आहे," असे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील बँकेच्या दीर्घकालीन ग्राहकांचा आणि माजी अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला:
प्रथम सेवा वितरण: नूतन विस्तारित लॉकरचे ग्राहक गणपती मंदिर ट्रस्टचे गजानन लोहगावकर यांना आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते चावी प्रदान करण्यात आली. तसेच सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्री. वाडकर यांना ठेव पावती डॉ. प्रियदर्शन चितळे यांच्या हस्ते देण्यात आली.
विशेष सत्कार: उद्योजक श्रीकांत तारळेकर, केदार खरे, पोलीस कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अभिजित पाटील यांचा आ. गाडगीळ यांच्या हस्ते विशेष सन्मान झाला. बँकेच्या माजी संचालिका डॉ. संपदा कानिटकर यांचा गौरव संचालिका सौ. स्वाती करंदीकर यांनी केला. याशिवाय उद्योजक अमोल रास्ते, मोहन जगताप, जयवंत माने, बांधकाम व्यावसायिक तात्यासाहेब खोत, उद्योजिका सौ. वर्षा मालेदार, कु. पार्थ चव्हाण आणि जयाताई जोशी यांचाही सत्कार करण्यात आला.
माजी शाखाधिकारी व वास्तुविशारद सन्मान: विश्रामबाग शाखेच्या वाटचालीत योगदान देणारे माजी शाखाधिकारी नारायण पाटील, अरविंद पुराणिक, सुरेश कोटीभास्कर, प्रमोद गोसावी, महावीर चौगुले, वास्तुविशारद सचिन साळुंखे, बांधकाम समिती सल्लागार
अभियंता विवेक चौथाई आणि कंत्राटदार श्री. जोशी यांचा सन्मान करण्यात आला.
व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ यांनी ‘परिवर्तन’ उपक्रमाच्या माध्यमातून बँकेने साधलेल्या प्रगतीचा पट उपस्थितांसमोर मांडला. बँकेचे अध्यक्ष सीए श्रीपाद खिरे यांनी अध्यक्षीय मनोगतात बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेत ग्राहकाभिमुख आणि आधुनिक सेवेसाठी बँक कटिबद्ध असल्याचे आवर्जून सांगितले.
प्रमुख पाहुणे डॉ. प्रियदर्शन चितळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘पंच परिवर्तन’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी बँकेच्या एकंदरीत प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. "सहकार क्षेत्रातील संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि ग्राहकांचा विश्वास यांची योग्य सांगड घालून पुढे जाणे काळाची गरज आहे. सांगली अर्बन बँकेच्या पाठीशी आम्ही यापुढेही नेहमी खंबीरपणे उभे राहू," अशी ग्वाही त्यांनी दिली.
या सोहळ्याला बँकेचे उपाध्यक्ष संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी उल्हास नायक, संचालक सीए अनंत मानवी, हणमंतराव पाटील, कालिदास हरिदास, सागर घोंगडे, सौ. स्वाती करंदीकर, सौ. अश्विनी आठवले, रवींद्र भाकरे, मनोज कोरडे, तज्ज्ञ संचालक सीए सागर फडके, सरव्यवस्थापक वासुदेव दिवेकर, शाखाधिकारी भालचंद्र बक्षी यांच्यासह सल्लागार समिती सदस्य, सभासद, ठेवीदार, ग्राहक व बँक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रसिद्धी अधिकारी संदीप कुलकर्णी यांनी केले, तर संचालक सागर घोंगडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीत 'वंदे मातरम'ने कार्यक्रमाची सांगता झाली.