

अहमदाबाद: ऑनलाईन खरेदी करताना साधी-मोठी चूकही किती महागात पडू शकते, याचं धक्कादायक उदाहरण अहमदाबादमध्ये समोर आलं आहे. अवघ्या २४ रुपयांच्या वांग्यांच्या रिफंडसाठी संपर्क साधताना एका महिलेला तब्बल ८७ हजार रुपयांची फसवणूक सहन करावी लागली. फक्त एक चुकीचा कॉल, एक बनावट लिंक आणि काही मिनिटांत संपूर्ण बँक खातं रिकामं झालं.
अहमदाबादमधील एका महिलेनं तीन दिवसांपूर्वी क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘झेप्टो’वरून भाज्या ऑर्डर केल्या होत्या. त्यामध्ये अवघ्या २४ रुपयांची वांगी मागवण्यात आली होती. मात्र, डिलिव्हरीवेळी आलेली वांगी अपेक्षेपेक्षा खूप मोठ्या आकाराची असल्याने महिलेनं रिटर्न आणि रिफंडची मागणी केली.
डिलिव्हरी बॉयशी संवाद साधल्यानंतर त्यानं रिफंड आपल्याकडून होऊ शकत नसल्याचं सांगत कस्टमर केअरशी संपर्क करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याच्याकडे कोणताही अधिकृत कस्टमर केअर नंबर नव्हता.
यानंतर महिलेनं इंटरनेटवर झेप्टोचा कस्टमर केअर नंबर शोधण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान तिला एक बनावट, फसवणूक करणारा नंबर सापडला. त्या नंबरवरून संपर्क साधताच समोरून बोलणाऱ्या व्यक्तीनं स्वतःला कंपनीचा एक्झिक्युटिव्ह असल्याचं भासवलं.
त्या ठगानं महिलेला व्हॉट्सॲपवर कॉल करण्यास सांगितलं. व्हॉट्सॲप कॉलदरम्यान त्यानं ऑर्डरचे तपशील, मोबाईल नंबर आणि इतर प्राथमिक माहिती विचारली. काही वेळातच रिफंडची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचा दावा करण्यात आला.
यानंतर ठगानं महिलेला रिफंड स्टेटस पाहण्यासाठी एक लिंक पाठवली. महिलेनं ती लिंक उघडताच तिथे बँक खात्याचे तपशील भरण्यास सांगण्यात आलं. फसवणूक असल्याची शंका न येता महिलेनं आपली माहिती भरली आणि त्यानंतर यूपीआय पासवर्ड टाकून बॅलन्स चेक केला.
रिफंडचे पैसे खात्यात न दिसल्यानं महिलेनं पुन्हा फोन केला. यावेळी ठगानं दुसऱ्या खात्याचा बॅलन्स चेक करण्यास सांगितलं. ती प्रक्रिया पूर्ण करताच ८७ हजार रुपये खात्यातून गायब झाल्याचं तिच्या लक्षात आलं.
फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी हे प्रकरण सायबर फसवणुकीचं असल्याचं स्पष्ट करत सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
सायबर तज्ज्ञ आणि पोलीस प्रशासनानुसार,
कोणतीही कंपनी कधीही व्हॉट्सॲप कॉलवर बँक तपशील किंवा यूपीआय पासवर्ड मागत नाही.
कस्टमर केअर नंबर नेहमी अधिकृत ॲप किंवा वेबसाइटवरूनच घ्यावा.
अनोळखी लिंकवर क्लिक करून बँक तपशील टाकणे म्हणजे थेट सायबर चोरांच्या जाळ्यात अडकणं होय.
ही घटना केवळ एका महिलेपुरती मर्यादित नसून, ऑनलाईन रिफंड, फेक कस्टमर केअर नंबर आणि व्हॉट्सॲप कॉलद्वारे होणाऱ्या फसवणुकीचं जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी अधिक जागरूक आणि सतर्क राहण्याची गरज असल्याचं प्रशासनाने आवाहन केलं आहे.