२०२५ नंतर २०२६ मध्येही कर्जदारांसाठी ‘गुड न्यूज’? रिझर्व्ह बँकेडून पुन्हा दरकपातीचे संकेत

गेल्या वर्षी चार वेळा व्याजदर कपात करून रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना मोठा दिलासा दिला होता. आता फेब्रुवारीत पुन्हा २५ बेसिस पॉईंट्सची कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
RBI Sanjay Malhotra
२०२५ नंतर २०२६ मध्येही कर्जदारांसाठी ‘गुड न्यूज’? रिझर्व्ह बँकेडून पुन्हा दरकपातीचे संकेत
Published on

RBI Repo Rate Cut News : गृहकर्जाचा हप्ता, वाहन कर्जाची ईएमआय आणि वैयक्तिक कर्जाचा भार डोक्यावर असलेल्या मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी आहे. डिसेंबर २०२५ मध्ये दिलेल्या व्याजदर कपातीनंतर, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) फेब्रुवारी २०२६ मध्ये पुन्हा एकदा कर्जदारांना दिलासा देण्याची शक्यता आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या ताज्या अहवालानुसार, रिझर्व्ह बँक आगामी पतधोरण बैठकीत रेपो दरात २५ बेसिस पॉईंट्सची (०.२५%) कपात करू शकते.

फेब्रुवारीत २५ बेसिस पॉईंट्सची कपात?

सध्या देशातील रेपो रेट ५.२५ टक्के इतका आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या विश्लेषणानुसार, फेब्रुवारी २०२६ च्या पतधोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँक व्याजदर कपातीचे आपले धोरण कायम ठेवू शकते. जर ०.२५ टक्क्यांची कपात झाली, तर रेपो रेट थेट ५ टक्क्यांवर येईल. ही पातळी गेल्या अनेक वर्षांतील सर्वात कमी व्याजदरांपैकी एक मानली जात आहे.

गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार

रेपो दरात कपात झाल्यास त्याचा थेट फायदा कर्जदारांना होतो. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदर कमी होण्याची शक्यता असते. परिणामी, मासिक ईएमआयमध्ये घट होऊन सर्वसामान्य कुटुंबांच्या बजेटला मोठा दिलासा मिळू शकतो. नवीन घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी ही बातमी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे.

RBI Sanjay Malhotra
पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांना ‘सिबिल’ची सक्ती करू नका !

महागाई नियंत्रणात; विकासाला प्राधान्य

रिझर्व्ह बँक व्याजदर कपात का करत आहे, यामागे महागाईचा दर नियंत्रणात राहणे हे प्रमुख कारण आहे. युनियन बँकेच्या अहवालानुसार, सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे महागाईत सुमारे ०.५० टक्क्यांची भर पडत असली, तरी मूळ (Core Inflation) महागाई दर तुलनेने कमी आहे. महागाईचा धोका आटोक्यात आल्याने रिझर्व्ह बँकेने आता आर्थिक विकासाला चालना देण्यावर भर दिला आहे.

‘बेस इयर’ बदलाचा परिणाम

फेब्रुवारी २०२६ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आणि सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) यांच्या ‘बेस इयर’मध्ये बदल होणार आहे. या बदलाचा थेट परिणाम महागाई आणि आर्थिक वाढीच्या आकडेवारीवर होईल. त्यामुळे आरबीआयच्या निर्णय प्रक्रियेत हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

२०२५: कर्जदारांसाठी दिलासादायक वर्ष

गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने सलग व्याजदर कपात करून कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे.

  • फेब्रुवारी २०२५ : ०.२५% कपात

  • एप्रिल २०२५ : ०.२५% कपात

  • जून २०२५ : ०.५०% ची मोठी कपात

  • डिसेंबर २०२५ : ०.२५% कपात (रेपो रेट ५.२५% वर)

या चार कपातींमुळे कर्जदारांच्या ईएमआयमध्ये लक्षणीय घट झाली असून आर्थिक भार काही प्रमाणात हलका झाला आहे.

RBI Sanjay Malhotra
FD गुंतवणूकदारांना फटका; मुदत ठेवींवरील परतावा घटण्याची शक्यता

एफडी गुंतवणूकदारांची चिंता वाढणार?

एकीकडे कर्जदार आनंदात असले, तरी दुसरीकडे मुदत ठेवींवर (FD) अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरू शकते. रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर बँका त्यांच्या एफडीवरील व्याजदरही कमी करतात. यामुळे ठेवीदारांना मिळणारा परतावा घटण्याची शक्यता असून, सुरक्षित गुंतवणुकीवर अवलंबून असलेल्यांसाठी हा मोठा फटका ठरू शकतो.

फेब्रुवारी २०२६ मध्ये रेपो रेट ५ टक्क्यांवर येण्याची शक्यता खरी ठरल्यास, कर्जदारांसाठी हे खरोखरच ‘अच्छे दिन’ असतील. मात्र, एफडी गुंतवणूकदारांसाठी हा काळ सावधगिरीचा ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष रिझर्व्ह बँकेच्या फेब्रुवारीतील पतधोरण बैठकीकडे लागले आहे.

Banco News
www.banco.news