

महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरी, ग्रामीण बिगर कृषी व पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थांनी महाराष्ट्र राज्य बिगर कृषि सहकारी पतसंस्था नियामक मंडळ, पुणे यांच्या Management Information System (MIS) या ऑनलाईन प्रणालीत आवश्यक माहिती भरण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील मुदतवाढ दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे.
या संदर्भात सहकार आयुक्तालयाने १ जानेवारी २०२६ रोजी सर्व विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक तसेच उपनिबंधक/सहाय्यक निबंधक यांना परिपत्रक जारी केले आहे. यापूर्वी ७ नोव्हेंबर, १९ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर व ११ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनांनुसार MIS प्रणालीत माहिती भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती.
तथापि, अद्यापही राज्यातील अनेक सहकारी पतसंस्थांनी MIS प्रणालीत माहिती भरलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व कार्यरत पतसंस्थांची माहिती ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्णपणे भरली जाईल, याची दक्षता घ्यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
जे कार्यरत सहकारी पतसंस्था ३१ जानेवारी २०२६ पर्यंत MIS प्रणालीत माहिती भरण्यात अपयशी ठरतील, त्यांचा शोध घेऊन सहकारी कायदा व नियमांनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तालुकास्तरीय उपनिबंधक व सहाय्यक निबंधकांना पतसंस्थांचे जादा किंवा दुबार लॉगिन हटविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या पतसंस्थांनी एकापेक्षा अधिक वेळा लॉगिन नोंदवले आहे, अशा लॉगिनची खात्री करून ते तातडीने प्रणालीतून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
MIS प्रणालीसाठी देण्यात आलेल्या लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून संबंधित कार्यालयांनी आपले प्रोफाइल त्वरित अद्ययावत करावे, असेही सहकार आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
या आदेशावर सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांची स्वाक्षरी असून, MIS प्रणालीत माहिती भरण्याबाबत ही अंतिम संधी असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.