हॅकर्सची खैर नाही! सहकारी बँकांसाठी देशातील पहिलं 'सायबर सुरक्षा केंद्र'

राज्य सहकारी बँकेचा मोठा पुढाकार; पुणे जिल्हा बँकही लवकरच अत्याधुनिक 'सायबर सुरक्षा केंद्रा'शी जोडली जाणार.
Cyber Security Center for Co-operative Banks
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा बँकांना राज्य सहकारी बँकेकडून मोफत सायबर सुरक्षा सेवा.
Published on
  • पुणे: डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या व्यापाबरोबरच बँकिंग क्षेत्रापुढील सायबर हल्ल्यांचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सहकारी बँकांचा आणि पर्यायाने सामान्य नागरिकांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सहकारी बँकेने (MSC Bank) एक मोठे पाऊल उचलले आहे. नवी मुंबईतील वाशी येथे राज्य सहकारी बँकेने अत्याधुनिक 'सायबर सुरक्षा केंद्र' (Cyber Security Center) सुरू केले असून, यामुळे बँकांच्या सर्व्हरवर होणारे विविध सायबर हल्ले यशस्वीपणे रोखण्यात मोठे यश आले आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा बँकांची सुरक्षा वाढवण्यासाठी आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (PDCC) देखील लवकरच या सुविधेचा वापर सुरू करणार आहे. राज्यातील इतर चार जिल्हा बँकांनी आधीच या सुरक्षा कवचाचा वापर सुरू केला आहे.

सहकार विभागाचे सर्व जिल्हा बँकांना बंधनकारक आदेश

काही वर्षांपूर्वी पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्यानंतर राज्य सहकारी बँकेलाही अशा धोक्यांची झळ पोहोचली होती. हाच धोका ओळखून बँकेने हे केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला.

राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी नवी मुंबईत पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की,

"आज देशात ४२ टक्के व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांचे प्रमाणही वाढले आहे. जनतेचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे आणि सहकार आयुक्त प्रवीण देवरे यांनी राज्यातील सर्व ३१ जिल्हा बँकांनी या सायबर सुरक्षा केंद्राचा वापर करावा, असे आदेश जारी केले आहेत."
Cyber Security Center for Co-operative Banks
राज्य सहकारी बँकेचे डिजिटल पाऊल: स्वतःचे UPI हँडल सुरू

४० कोटींचे बजेट आणि अत्याधुनिक यंत्रणा

  • गुंतवणूक आणि मनुष्यबळ: राज्याच्या ग्रामीण भागातील बँकिंग यंत्रणा सुरक्षित करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने चार वर्षांपूर्वी वाशी येथे ४० कोटी रुपये खर्चून हे अत्याधुनिक केंद्र उभारले. गेल्या अडीच वर्षांपासून ते प्रत्यक्ष कार्यरत असून, येथे ३५ कुशल संगणक अभियंते (Computer Engineers) २४ तास तैनात आहेत.

  • मोफत सेवा: विशेष म्हणजे, जिल्हा बँकांची शिखर संस्था या नात्याने राज्य सहकारी बँक ही अत्यंत खर्चिक असलेली सायबर सुरक्षा सेवा इतर जिल्हा बँकांना पूर्णपणे मोफत देत आहे.

  • सध्या जोडलेल्या बँका: सद्यस्थितीत राज्य बँकेसह सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्हा बँकेसह एकूण चार बँकांचे 'लिस्टिंग' पूर्ण झाले आहे. लवकरच पुणे जिल्हा बँक यात समाविष्ट होणार आहे. या केंद्राची एकूण क्षमता ५० बँकांना एकाच वेळी सेवा देण्याची आहे.

  • परदेशी हल्ले परतवले: गेल्या अडीच वर्षांत या बँकांच्या सर्व्हरवर केवळ भारतातूनच नव्हे, तर परदेशातूनही अनेक सायबर हल्ले झाले; परंतु या केंद्राने ते सर्व हल्ले यशस्वीपणे परतवून लावले आहेत.

'सायबर सुरक्षा केंद्राची' प्रमुख उद्दिष्ट्ये आणि वैशिष्ट्ये

  • धोक्यांचा आधीच छडा: ज्ञात आणि अज्ञात सायबर हल्ल्यांचा सुरुवातीच्या टप्प्यातच शोध घेऊन त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवणे.

  • कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर: केंद्रामध्ये 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) आधारित सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. याद्वारे सातत्याने निरीक्षण करून संभाव्य धोक्यांचे अलर्ट बँकांना दिले जातात.

  • सुरक्षा मोजमाप: बँकांच्या डिजिटल सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट करणे, त्रुटी शोधणे आणि त्या सुधारण्यासाठी योग्य त्या मार्गदर्शक सूचना देणे.

  • नियमांचे पालन व अहवाल: रिझर्व्ह बँक (RBI), नाबार्ड (NABARD) आणि केंद्र शासनाच्या सायबर नियमांचे पालन करण्यासाठी बँकांना आवश्यक अहवाल (Reports) तयार करण्यास मदत करणे.

"वाशी येथे उभारण्यात आलेल्या या सायबर सुरक्षा केंद्रामध्ये जिल्हा बँकांच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सायबर सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून अशी अत्याधुनिक सुविधा निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे." - विद्याधर अनासकर (प्रशासक, राज्य सहकारी बँक)
Banco News
www.banco.news