
आयसीआयसीआय बँकेने शहरी भागातील बचत खातेधारकांना ठेवावी लागणारी किमान सरासरी शिल्लक रक्कम तब्बल पाचपट वाढवण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे. १ ऑगस्टपासून ही मर्यादा पूर्वीच्या रु. १०,००० वरून थेट रु. ५०,००० करण्यात आलेली आहे. मात्र, पगार खात्यांना या नियमातून सूट देण्यात आलेली आहे.
१ ऑगस्टपूर्वीचे विद्यमान खातेधारक जुन्याच रु. १०,००० या किमान सरासरी शिल्लक ठेवण्याच्या नियमांनुसार राहतील. अर्धशहरी भागासाठी ही मर्यादा रु. २५,००० तर ग्रामीण भागासाठी रु. १०,००० इतकी करण्यात आलेली आहे. यापूर्वी ग्रामीण भागात ही मर्यादा रु. ५,००० होती. बँकेने स्पष्ट केले आहे की, किमान सरासरी शिल्लक न ठेवल्यास खातेधारकांना ६% शुल्क आकारले जाईल, जे परिस्थितीनुसार रु. ५०० पेक्षा कमी किंवा जास्त असू शकते.
सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या अनेक बँकांनी अलीकडेच किमान शिल्लक न ठेवल्यास आकारला जाणारा दंड रद्द केलेला असताना आयसीआयसीआय बँक मात्र प्रीमियम ग्राहकांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसते. त्यामुळे ही बाब निश्चितच दखल घेण्यासारखी ठरतेय. आता पाहावे लागेल की, इतर खासगी बँका देखील हा मार्ग स्वीकारतात का, कारण सध्या तरी त्यांनी किमान शिल्लक मर्यादा रु. १०,००० चीच ठेवलेली आहे.