कुरुंदवाड गणेश सहकारी बँकेचा नफा ५६ लाखांवर

सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर
गणेश सहकारी बँक
गणेश सहकारी बँक
Published on

कुरुंदवाड येथील दी गणेश सहकारी बँकेने आर्थिक वर्षात तब्बल ५६ लाख ५० हजारांचा नफा मिळवला असून, सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर केलेला आहे. अशी माहिती बँकेचे चेअरमन सदाशिव स. जोशी यांनी बँकेच्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली. यावेळी जवाहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

चेअरमन जोशी यांनी सांगितले की, "शेतकरी आणि सर्वसामान्य कर्जदारांनी वेळेत परतफेड केल्यामुळे याहीवर्षी बँकेचा NPA शून्य टक्के ठेवण्यात बँकेला यश आले आहे. ठेवींमध्ये ४ कोटी ४ लाखांची वाढ झालेली असून, पारदर्शक कारभार व ठेवीदारांच्या ठेवींना विमा संरक्षण दिल्याने बँकेवरील ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. रिझर्व्ह बँकेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्याबद्दल बँकेला "Banco Blue Ribbon पुरस्कार" देखील मिळालेला आहे."

मुख्य पाहुणे मनोहर जोशी यांनी आपल्या भाषणात ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकारी बँकांचे योगदान अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, गणेश बँकेने २००५, २००६, २०१९, २०२१ आणि २०२४ च्या महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत तसेच कोरोनासारख्या संकटातही सभासदांचे हित जपलेले आहे. १३.८०% भांडवल पर्याप्तता गुणोत्तर व सातत्याने दिला जाणारा लाभांश बँकेच्या प्रगतीचे निदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

गणेश सहकारी बँक
धाराशिव जनता सहकारी बँकेची वार्षिक सभा उत्साहात

गौरव आणि सन्मान :

या सभेत विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात –

* मनोहर गोपाळ जोशी (शुगर टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया पुरस्कार)

* उदयसिंह गायकवाड (नूतन प्रांताधिकारी)

* माजी नगराध्यक्ष बाळासाहेब दिवटे (५० वर्षांची यशस्वी सामाजिक-राजकीय वाटचाल)

* डॉ. नितीन घोरपडे (IMA राज्य कौन्सिलवर निवड)

* शरदचंद्र पराडकर (कुरुंदवाड भूषण पुरस्कार) यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक कै. सखाराम जोशी, कै. काशिनाथ जोशी व कै. गंगाधर जोशी यांच्या प्रतिमापूजनाने झाली. स्वागत ज्येष्ठ संचालक दिगंबर पुजारी यांनी केले, तर विषयपत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी नीता खलाटे यांनी केले. आभार प्रदर्शन व्हाईस चेअरमन रामचंद्र मोहिते यांनी केले. सभेस सर्व संचालक, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Banco News
www.banco.news