

औरंगाबाद : उत्कृष्ट वित्तीय व्यवस्थापन आणि ग्राहकसेवेच्या जोरावर सातत्याने प्रगतीपथावर असणाऱ्या 'श्री गजानन नागरी सहकारी बँकेने' पुन्हा एकदा राज्यपातळीवर आपल्या यशाचा डंका वाजवला आहे. 'दि महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड, मुंबई' यांच्या वतीने देण्यात येणारा वर्ष २०२५-२६ चा 'सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार' (प्रथम श्रेणी) श्री गजानन बँकेला जाहीर झाला असून, नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात या पुरस्काराने बँकेला सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील १०१ ते ३०० कोटी ठेवी असलेल्या बँकांच्या गटातून उत्तम कामगिरी करणाऱ्या सभासद बँकांमधून श्री गजानन नागरी सहकारी बँकेची या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
औरंगाबाद येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा
औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात 'नाफकब'चे (NAFCUB) अध्यक्ष श्री. लक्ष्मीदास यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेच्या वतीने संचालक श्री. आघाव दत्तात्रय बाजीराव, संचालक श्री. ढाकणे शरद दिनकरराव, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एम. आर. क्षीरसागर आणि सरव्यवस्थापक डॉ. एम. एस. शेख यांनी हा मानाचा पुरस्कार स्वीकारला.
बँकेने मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल बँकेचे चेअरमन श्री. जयदत्त सोनाजीराव क्षीरसागर (श्री. सागर उर्फ अण्णा), उपाध्यक्ष श्री. जगदीश वासुदेव काळे आणि संपूर्ण संचालक मंडळाने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक व स्वागत केले.
"हा पुरस्कार म्हणजे बँकेच्या ग्राहकांनी, सभासदांनी दाखवलेला विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. भविष्यातही बँक आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक व पारदर्शक सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहील." - बँक व्यवस्थापन
बँकेला मिळालेल्या या राज्यस्तरीय बहुमानामुळे सर्वच स्तरातून आणि ग्राहकवर्गातून श्री गजानन नागरी सहकारी बँकेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.