२०४७ पर्यंत आर्थिक व्यवहार काही सेकंदांत!

भारताच्या वित्तीय क्षेत्रात मोठा बदल अपेक्षित...
२०४७ पर्यंत आर्थिक व्यवहार काही सेकंदांत
२०४७ पर्यंत आर्थिक व्यवहार काही सेकंदांत
Published on
  • मुंबई : देशातील वित्तीय सेवा क्षेत्र पुढील काळात अधिक गतिमान, डिजिटल आणि सर्वसामान्यांसाठी आणखी सुलभ होईल तसेच २०४७ पर्यंत अनेक आर्थिक व्यवहार काही क्षणांत पूर्ण होतील, असा विश्वास आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या परिषदेत व्यक्त करण्यात आला.

२०४७ पर्यंत आर्थिक व्यवहार काही सेकंदांत
‘बँकिंग २०४७’ मिशनची सुरुवात- उच्चस्तरीय समितीची घोषणा

आयएमसीच्या बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस कमिटीचे सह-अध्यक्ष तसेच यू ग्रो कॅपिटलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक शचींद्र नाथ यांनी सांगितले की, बँकिंग, विमा, कर्जवितरण आणि गुंतवणूक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांना अधिक वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक सेवा मिळणार आहेत.

‘शेपिंग द फ्युचर ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस’ या विषयावर आयोजित परिषदेत बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ, फिनटेक कंपन्यांचे प्रतिनिधी, विमा क्षेत्रातील अधिकारी तसेच नियामक संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते. परिषदेत डिजिटल व्यवहार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सायबर सुरक्षा, डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि फिनटेक नवकल्पना या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

२०४७ पर्यंत आर्थिक व्यवहार काही सेकंदांत
सरकारी बँकांमध्ये एफडीआय मर्यादा २०% वरून ४९% करण्याचा प्रस्ताव

तज्ज्ञांनी सांगितले की, भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्था जगात वेगाने विकसित होत असून यूपीआय, एआय आधारित सेवा आणि ऑटोमेशनमुळे आर्थिक व्यवहार अधिक सुलभ होत आहेत. ग्रामीण आणि निमशहरी भागातही डिजिटल बँकिंगचा विस्तार वाढत असल्याने वित्तीय समावेशनाला मोठी चालना मिळत आहे.

सायबर सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना, वाढत्या डिजिटल व्यवहारांसोबत ग्राहकांच्या माहितीचे संरक्षण आणि सुरक्षित व्यवहार ही वित्तीय संस्थांसमोरील मोठी जबाबदारी असल्याचेही वक्त्यांनी नमूद केले. आगामी काळात एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीने फसवणूक नियंत्रण, कर्ज मूल्यांकन आणि ग्राहक सेवा अधिक परिणामकारक होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

परिषदेत भारताच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेत वित्तीय क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार असल्याचे सांगण्यात आले. तंत्रज्ञान, नवकल्पना आणि ग्राहककेंद्री सेवा यांच्या आधारावर भारताचे वित्तीय क्षेत्र जागतिक स्तरावर अधिक सक्षम होईल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

Banco News
www.banco.news