बँक खाते उघडताच आपोआप मिळतो विमा! DICGC अंतर्गत तुमच्या पैशांचे संरक्षण कसे होते?

सार्वजनिक, खाजगी, लघु वित्त व सहकारी बँकांमधील कोट्यवधी खातेधारकांना मिळणाऱ्या ₹५ लाखांच्या विमा संरक्षणाची सविस्तर माहिती.
Auto Deposit Insurance
बँक खाते उघडताच तुमच्या ठेवींवर आपोआप विमा संरक्षण लागू
Published on

बँकेत पैसे जमा करताना प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न असतो - “जर बँक अडचणीत आली तर माझ्या बचतीचे काय होईल?” अनेकांना माहीत नसलेली पण दिलासादायक बाब म्हणजे, भारतात बँक खाते उघडताच तुमच्या ठेवींवर आपोआप विमा संरक्षण लागू होते. हे संरक्षण डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पूर्ण मालकीच्या उपकंपनीकडून दिले जाते.

DICGC म्हणजे काय?

DICGC ही संस्था बँकांमधील ठेवींचे विमा संरक्षण करते. बँक अडचणीत आली, स्थगिती लादली गेली किंवा बंद पडली, तर खातेधारकांच्या ठेवींची सुरक्षितता राखण्यासाठी ही संस्था काम करते.

DICGC अंतर्गत कोणत्या बँका येतात?

देशातील जवळजवळ सर्व रिझर्व्ह बँक-परवानाधारक बँका DICGC अंतर्गत येतात. यामध्ये -

  • सार्वजनिक क्षेत्रातील बँका

  • खाजगी क्षेत्रातील बँका

  • लघु वित्त बँका

  • प्रादेशिक ग्रामीण बँका

  • स्थानिक क्षेत्रातील बँका

  • बहुतेक सहकारी बँका

याचा अर्थ असा की तुमचे खाते रिझर्व्ह बँक-परवानाधारक बँकेत असल्यास ते साधारणपणे DICGC विम्याअंतर्गत सुरक्षित असते.

Auto Deposit Insurance
एप्रिल २०२६ पासून बँकांसाठी जोखमीवर आधारित विमा प्रीमियम प्रणाली; सुरक्षित बँकांना मोठा दिलासा

कोणत्या ठेवींचा विमा उतरवला जातो?

DICGC जवळजवळ सर्व सामान्य ठेवींना विमा देते, त्यामध्ये –

  • बचत खाते

  • चालू खाते

  • मुदत ठेवी (FD)

  • आवर्ती ठेवी (RD)

  • इतर तत्सम ठेवी

विमा लागू होत नाही:

  • केंद्र व राज्य सरकारांच्या ठेवी

  • परदेशी सरकारांच्या ठेवी

  • आंतर-बँक ठेवी

  • काही विशिष्ट श्रेणीतील संस्थात्मक ठेवी

कमाल विमा किती मिळतो?

DICGC नियमांनुसार, प्रति खातेधारक, प्रति बँक कमाल ₹५ लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते.
या रकमे मध्ये -

  • मुद्दल व त्यावर मिळणारे व्याज दोन्ही समाविष्ट असतात.

उदाहरणार्थ, जर तुमच्या बँकेत सर्व खात्यांची एकूण रक्कम ₹५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर ती रक्कम पूर्णपणे विम्याअंतर्गत सुरक्षित असते.

एकाच बँकेत अनेक खाती असतील तर?

जर तुमची एकाच बँकेत अनेक खाती असतील (उदा. सेव्हिंग, FD, RD), तर सर्व खात्यांची रक्कम एकत्र केली जाते आणि एकूण रकमेवरच ₹५ लाखांची मर्यादा लागू होते.

Auto Deposit Insurance
बँकांतील ४१.५ टक्के ठेवींना विमा संरक्षण – रिझर्व्ह बँक अहवाल

वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती असतील तर?

जर तुमची खाती दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये असतील, तर प्रत्येक बँकेसाठी स्वतंत्र ₹५ लाख विमा संरक्षण मिळते.
उदा.

  • बँक A: ₹५ लाखांपर्यंत विमा

  • बँक B: ₹५ लाखांपर्यंत विमा

बँक संकटात आली तर पैसे कसे मिळतात?

जर रिझर्व्ह बँकेने एखाद्या बँकेवर स्थगिती लादली, विलिनीकरण केले किंवा बँक बंद झाली, तर DICGC विमा प्रक्रिया सुरू करते.
या प्रक्रियेत -

  • बँक DICGC कडे खातेधारकांची माहिती पाठवते

  • पात्र खात्यांची पडताळणी केली जाते

  • ठराविक कालावधीत विमा रक्कम खातेधारकांना दिली जाते

ही रक्कम सामान्यतः काही आठवड्यांत किंवा महिन्यांत मिळते, त्यामुळे खातेधारकांना मोठा आर्थिक धक्का बसत नाही.

तुम्ही बँकेत खाते उघडताच तुमच्या ठेवींवर आपोआप विमा लागू होतो, याची अनेकांना कल्पना नसते. DICGC मुळे लाखो लोकांच्या बचती सुरक्षित राहतात. त्यामुळे बँकेत पैसे ठेवताना तुम्ही निश्चिंत राहू शकता - कारण तुमच्या ठेवींना आधीच संरक्षण आहे!

Banco News
www.banco.news