

नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज (NAFCUB), नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NUCFDC) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स (NAFSCOB) या तिन्ही प्रमुख संघटनांनी स्पष्ट केले आहे की, सहकारी बँका या संपात सहभागी होणार नाहीत. ग्राहक, शेतकरी, व्यापारी आणि सदस्यांना अखंडित बँकिंग सेवा पुरवण्यासाठी सर्व संस्था कटिबद्ध आहेत.
भारतातील ग्रामीण, निमशहरी आणि शहरी भागात सहकारी बँकिंगचे प्रचंड जाळे पसरलेले आहे. यामध्ये:
१,४५० नागरी सहकारी बँका (UCBs)
३४ राज्य सहकारी बँका (StCBs)
३५१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका (DCCBs)
या सर्व बँका २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान नियमित वेळेत उघड्या राहतील, ज्यामुळे शेतकरी, छोटे उद्योजक, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे आर्थिक व्यवहार खोळंबणार नाहीत.
संपाच्या काळात ग्राहक आणि सभासद आपल्या जवळच्या सहकारी बँकेच्या शाखेत किंवा डिजिटल माध्यमांद्वारे खालील सेवांचा लाभ घेऊ शकतात:
शाखा बँकिंग: रोख ठेवी स्वीकारणे, पैसे काढणे, ड्राफ्ट आणि इतर दैनंदिन व्यवहार.
कृषी व ग्रामीण पतपुरवठा: शेतकरी आणि ग्रामीण कुटुंबांसाठी कर्जाशी संबंधित व पतपुरवठ्याचे व्यवहार पूर्ववत सुरू राहतील.
व्यावसायिक सेवा: व्यापारी आणि सूक्ष्म-लघु उद्योजकांसाठीच्या बँकिंग सुविधा उपलब्ध असतील.
डिजिटल बँकिंग: संबंधित बँकांचे एटीएम (ATM), मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि यूपीआय (UPI) सेवा सुरळीत सुरू राहतील.
"तळागाळातील सामान्य जनता, शेतकरी आणि स्थानिक व्यवसायांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सहकारी बँकिंग क्षेत्र आपली सेवा अखंडित चालू ठेवणार आहे," असे आश्वासन NAFCUB, NUCFDC आणि NAFSCOB ने दिले आहे.
विशिष्ट सेवा किंवा व्यवहारांच्या वेळेबाबत अधिक माहितीसाठी ग्राहकांनी आपापल्या स्थानिक सहकारी बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही या संघटनांनी केले आहे.