CTS क्लिअरिंगसाठी रविवारीही सहकारी बँका सुरू राहणार

२८ ते ३० सप्टेंबरच्या सार्वजनिक बँकांच्या संप पार्श्वभूमीवर निर्णय; रिझर्व्ह बँकेचे स्पष्टीकरण
cooperative bank open 27 september
सहकारी बँकांबाबत रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
Published on: 

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान प्रस्तावित केलेल्या राष्ट्रीय संपाच्या पार्श्वभूमीवर, चेक क्लिअरिंग आणि सेटलमेंट प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर, चेक ट्रंकेशन सिस्टीम (CTS) क्लिअरिंग आणि सेटलमेंट सुलभतेने पार पाडण्यासाठी सर्व नागरी सहकारी बँकांनी (UCBs) उद्या, रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी आपल्या शाखा खुल्या ठेवाव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे.

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनने (महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक महासंघ) रविवारच्या कामकाजासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडे स्पष्टीकरण मागवले होते. त्यावर रिझर्व्ह बँकेने हे निर्देश जारी केले आहेत.

रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, २७ सप्टेंबर रोजी CTS क्लिअरिंग पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील. त्यामुळे सेटलमेंट आणि क्लिअरिंग पूर्ण करण्यासाठी नागरी सहकारी बँकांचे कामकाज सुरू असणे आवश्यक आहे. याशिवाय, बँकेच्या व्यवस्थापनाने निर्णय घेतल्यास, रविवारी क्लिअरिंगसोबतच इतर नियमित बँकिंग व्यवहारदेखील नेहमीप्रमाणे पार पाडले जाऊ शकतात, अशी सूट रिझर्व्ह बँकेने दिली आहे.

रविवारच्या या विशेष कामकाजाची आणि त्यादिवशी उपलब्ध असणाऱ्या सेवांची माहिती सर्व ग्राहकांपर्यंत तात्काळ पोहोचावी, यासाठी बँकांनी ईमेल, व्हॉट्सॲप अथवा एसएमएसद्वारे त्वरित संदेश पाठवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. चेक क्लिअरिंगची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व नागरी सहकारी बँकांनी आपापल्या स्तरावर योग्य ती तयारी व कारवाई करावी, असे आवाहन महासंघ आणि मध्यवर्ती बँकेकडून करण्यात आले आहे.

Banco News
www.banco.news