

वॉशिंग्टन/नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी 'अॅमेझॉन'ला एका सराईत स्कॅमर गँगने तब्बल ३८ कोटी रुपयांचा (४ दशलक्ष डॉलर्स) गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही गँग टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून आपली 'रिफंड स्कीम' चालवत होती. याप्रकरणी अॅमेझॉनने वॉशिंग्टन डीसी न्यायालयात 'RBK' नावाच्या ग्रुपवर गुन्हा दाखल केला आहे.
अॅमेझॉनने दिलेल्या तक्रारीनुसार, RBK नावाचा हा ग्रुप ग्राहकांना अयोग्य मार्गाने रिफंड मिळवून देण्याचे काम करत होता. प्रामुख्याने ग्राफिक कार्ड आणि लॅपटॉप यांसारख्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर हा स्कॅम करण्यात आला. या ग्रुपने अमेरिका, कॅनडा आणि युरोपसह अनेक देशांतील अॅमेझॉन सेवांना टार्गेट केले.
हा घोटाळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवला जात होता:
१. टेलिग्रामवर जाहिरात: RBK ग्रुप टेलिग्रामवर अॅमेझॉनचा लोगो आणि नाव वापरून आपल्या सेवांचा प्रचार करायचा. त्यांचे १,००० पेक्षा जास्त सबस्क्राइबर्स होते.
२. लॉगिन माहितीचा वापर: युजर्स अॅमेझॉनवरून महागड्या वस्तू खरेदी करायचे आणि त्यानंतर या ग्रुपला आपली लॉगिन माहिती द्यायचे.
३. कमिशनचा खेळ: या कामासाठी RBK ग्रुप ग्राहकाकडून एकूण ऑर्डरच्या १५ ते ३० टक्के रक्कम चार्ज करत असे.
४. बनावट तक्रारी आणि सोशल इंजिनीअरिंग: हा ग्रुप अॅमेझॉनच्या कस्टमर केअरशी ग्राहक बनून संपर्क साधायचा. "आम्हाला रिकामे बॉक्स मिळाले आहेत" किंवा "पार्सल मिळालेच नाही" असा खोटा दावा केला जायचा. इतकेच नाही तर अॅमेझॉनला फसवण्यासाठी बनावट पोलीस रिपोर्ट देखील सादर केले जायचे.
हा घोटाळा उघड करण्यासाठी अॅमेझॉनच्या एका तपासकर्त्याने बनावट ग्राहक बनून जाळे रचले.
तपासकर्त्याने १९९ डॉलर्सचे प्ले-स्टेशन खरेदी केले आणि आरबीकेच्या सेवेसाठी १०० बिटकॉईनमध्ये पेमेंट केले.
त्यानंतर आरबीकेने त्याला रिफंड मिळवून दिला.
तपास सुरू असताना टेलिग्रामवरील फोटो आणि व्हिडिओंवरून कझाकिस्तानमधील दिआस झुमानियाझ या मुख्य आरोपीचा पत्ता आणि फोन नंबर शोधण्यात यश आले.
अॅमेझॉनने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत प्रामुख्याने तीन नावांचा उल्लेख केला आहे:
दिआस झुमानियाझ (Administrator)
मायकल बुशेल्ट
अदनान इस्लाम यांच्यासह इतर २० अज्ञात लोकांवरही आरोप ठेवण्यात आले आहेत. फेब्रुवारी २०२३ पासून या ग्रुपने २१०० पेक्षा जास्त बनावट रिफंड व्हाउचर फाईल केले होते.ऑनलाईन शॉपिंग करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला किंवा ग्रुपला तुमची लॉगिन माहिती शेअर करू नका. अशा प्रकारच्या रिफंड स्कीममध्ये सामील होणे कायदेशीर कचाट्यात पाडू शकते.
या प्रकरणाच्या तपासासाठी अॅमेझॉनने आतापर्यंत ७५ हजार डॉलर्स (सुमारे ७० लाख रुपये) खर्च केले आहेत. कंपनीने कोर्टाकडे मागणी केली आहे की:
आरोपींकडून झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई मिळावी.
रिफंडची रक्कम आणि कोर्ट केसचा खर्च आरोपींनी द्यावा.
आरोपींना अॅमेझॉनचा लोगो, ट्रेडमार्क किंवा टेलिग्रामवर अशा सेवा देण्यास कायमची बंदी घालावी.