Advance tax alert - last date
करदात्यांनी १५ मार्च २०२६ पर्यंत ॲडव्हान्स टॅक्सचा चौथा आणि अंतिम हप्ता भरणे आवश्यक

Advance Tax Alert: करदात्यांनो, १५ मार्चची डेडलाईन विसरू नका! नाही तर व्याजाचा दंड

Advance Tax Deadline : आर्थिक वर्ष २०२५-२६ संपण्याआधी करदात्यांसाठी महत्त्वाची सूचना
Published on

आर्थिक वर्ष २०२५-२६ आता शेवटच्या टप्प्यात आले असून करदात्यांसाठी एक महत्त्वाची डेडलाईन जवळ आली आहे. ज्यांची वार्षिक कर देयता १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा करदात्यांनी १५ मार्च २०२६ पर्यंत ॲडव्हान्स टॅक्सचा चौथा आणि अंतिम हप्ता भरणे आवश्यक आहे. ही मुदत चुकल्यास व्याज आणि दंडाचा आर्थिक फटका बसू शकतो.

कर विभागाच्या नियमानुसार वर्षभरातील कर देयता टप्प्याटप्प्याने भरावी लागते. यालाच ॲडव्हान्स टॅक्स किंवा आगाऊ कर असे म्हणतात. वर्षाच्या शेवटी एकदम मोठी रक्कम भरण्याचा ताण कमी करण्यासाठी सरकारने ही व्यवस्था लागू केली आहे.

ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे काय?

ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे चालू आर्थिक वर्षात मिळणाऱ्या उत्पन्नावर आगाऊ पद्धतीने भरला जाणारा कर. जर एखाद्या करदात्याची एकूण कर देयता १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्याला वर्षभरात चार हप्त्यांमध्ये कर भरणे बंधनकारक असते.

या व्यवस्थेमुळे सरकारला नियमित महसूल मिळतो आणि करदात्यांवरही वर्षाच्या शेवटी मोठ्या कराचा ताण येत नाही.

Advance tax alert - last date
12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त? नवीन कर प्रणालीतील 5 मोठे फायदे समजून घ्या

कोणाला ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो?

ॲडव्हान्स टॅक्स केवळ व्यापारी किंवा उद्योजकांपुरता मर्यादित नाही. अनेक वेळा पगारदार व्यक्तींनाही हा कर भरावा लागू शकतो.

जर तुमच्या पगाराव्यतिरिक्त इतर स्रोतांमधून उत्पन्न होत असेल आणि त्यावर पुरेसा TDS कापला गेला नसेल, तर ॲडव्हान्स टॅक्स भरणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ:

  • बँक ठेवींवरील व्याज

  • घरभाडे उत्पन्न

  • शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमधील नफा

  • फ्रीलान्स किंवा साइड बिझनेस उत्पन्न

ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत

६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना, जर त्यांचे उत्पन्न व्यवसायातून नसून केवळ पेन्शन किंवा व्याजातून असेल, तर त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरण्यापासून सूट मिळते. मात्र, व्यवसाय किंवा व्यावसायिक उत्पन्न असल्यास त्यांनाही हा कर भरावा लागतो.

ॲडव्हान्स टॅक्सचे हप्ते

प्राप्तिकर विभागाने करदात्यांना आर्थिक ताण कमी व्हावा यासाठी चार हप्त्यांचे वेळापत्रक दिले आहे.

  • १५ जून – एकूण कराच्या किमान १५%

  • १५ सप्टेंबर – एकूण कराच्या ४५% (मागील हप्त्यासह)

  • १५ डिसेंबर – एकूण कराच्या ७५% (मागील हप्त्यासह)

  • १५ मार्च – एकूण कराच्या १००% रक्कम भरणे आवश्यक

यातील १५ मार्च हा अंतिम हप्ता असल्याने या तारखेपर्यंत संपूर्ण कर भरणे आवश्यक आहे.

मुदत चुकल्यास काय दंड लागतो?

जर करदात्याने ॲडव्हान्स टॅक्स वेळेत भरला नाही किंवा आवश्यक रक्कम भरली नाही, तर त्याला व्याज द्यावे लागते. प्राप्तिकर कायद्यातील कलम 234B आणि 234C अंतर्गत देय करावर दरमहा सुमारे १ टक्का व्याज आकारले जाते.

यामुळे कराची रक्कम वाढू शकते. त्यामुळे करदात्यांनी वेळेत हप्ता भरून दंड टाळणे फायदेशीर ठरते.

ॲडव्हान्स टॅक्स ऑनलाईन कसा भरावा?

आजच्या डिजिटल युगात ॲडव्हान्स टॅक्स भरण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. करदाते घरबसल्या काही मिनिटांत पेमेंट करू शकतात.

  1. प्राप्तिकर विभागाच्या e-Filing पोर्टलवर लॉगिन करा.

  2. e-Pay Tax पर्याय निवडा.

  3. Challan No. 100 (Advance Tax) निवडा.

  4. नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट करा.

  5. पेमेंट झाल्यानंतरची रसीद जतन करून ठेवा, कारण आयकर रिटर्न भरताना ती आवश्यक असते.

Advance tax alert - last date
अर्थसंकल्प 2026 : आयकर सवलतीपेक्षा कर सुलभीकरणावर सरकारचा भर

करदात्यांसाठी महत्त्वाचा सल्ला

आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी आपल्या उत्पन्नाचा आढावा घेऊन कराची अंदाजे देयता तपासणे अत्यंत गरजेचे आहे. आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ॲडव्हान्स टॅक्सची रक्कम भरल्यास भविष्यातील व्याज आणि दंड टाळता येऊ शकतो.

१५ मार्च ही तारीख जवळ येत असल्याने करदात्यांनी विलंब न करता आपला अंतिम हप्ता भरून आर्थिक वर्षाची करप्रक्रिया सुरळीत पूर्ण करावी.

Banco News
www.banco.news