घर, गाडी, शिक्षण किंवा वैयक्तिक गरजांसाठी बँकांकडून किंवा एनबीएफसीकडून घेतलेले कर्ज अनेकदा आर्थिक अडचणींमुळे वेळेवर फेडता येत नाही. अशावेळी काही बँका आणि वित्तीय संस्था कर्ज वसुली एजंट्सना पाठवतात. मात्र या एजंट्सनी ग्राहकांना धमकावणे, शिवीगाळ करणे किंवा त्यांच्या नातलगांना फोन करून अपमानास्पद वागणूक देणे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांविरुद्ध आहे.
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, रिकव्हरी एजंट्सनी नेहमी व्यावसायिक आणि नैतिक पद्धतीने वागले पाहिजे. त्यांना ग्राहकांच्या प्रायव्हसीचे उल्लंघन करण्याची परवानगी नाही. एजंट्सनी ग्राहकांशी संपर्क साधताना आपली ओळख सांगणे बंधनकारक आहे तसेच बँकेचे ऑथरायजेशन लेटर आणि ओळखपत्र त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे.
संपर्क वेळेची मर्यादा:
हे एजंट्स सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेतच ग्राहकांशी संपर्क साधू शकतात. त्यापलीकडे संपर्क करणे हे नियमभंग ठरते.
घर किंवा ऑफिसला भेट:
एजंट्सना ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिसला जाण्याची परवानगी आहे, पण केवळ ग्राहकाची पूर्वसंमती घेतल्यानंतरच. अचानक भेट देणे किंवा परवानगीशिवाय येणे हे बेकायदेशीर आहे.
ग्राहकांचे अधिकार:
ग्राहकाला सन्मानाने वागवलं जाण्याचा अधिकार आहे.
एजंट्सनी धमक्या देणे, अपशब्द वापरणे किंवा हिंसा करणे कठोरपणे मनाई आहे.
ग्राहकांना आपल्या कर्जाची संपूर्ण माहिती – थकबाकी, व्याजदर, अतिरिक्त शुल्क याची पारदर्शक माहिती मागण्याचा अधिकार आहे.
गैरवर्तन झाल्यास ग्राहक बँकेकडे तक्रार दाखल करू शकतात.
कारवाई न झाल्यास रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग लोकपालाकडे (Banking Ombudsman) तक्रार दाखल करता येते.
काय करावे जर एजंट धमकावत असेल?
एजंट्सकडून धमकी, शिवीगाळ किंवा छळ झाल्यास घाबरू नका. संभाषणाचे रेकॉर्ड ठेवा, कॉल रेकॉर्ड करा आणि बँकेच्या नोडल ऑफिसरकडे लेखी तक्रार दाखल करा. गरज असल्यास पोलिसांकडेही तक्रार करता येते.
रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की, जर बँका किंवा त्यांच्या नियुक्त एजंट्सनी या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केले, तर रिझर्व्ह बँक त्यांच्यावर दंड किंवा वसुली बंदी लागू करू शकते.