नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२६ पासून सुरू झाले असून करदात्यांनी आतापासूनच कर नियोजनाला सुरुवात केली आहे. अनेकदा असे घडते की, विविध गुंतवणुकींवरील वजावट आणि सवलतींनंतर करपात्र उत्पन्न शून्यावर येते. अशा वेळी 'करच भरायचा नाहीये, तर आयटीआर (ITR) कशाला भरायचा?' असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते कर दायित्व शून्य असले तरी आयकर विवरणपत्र दाखल करणे तुमच्या आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे.
आयटीआर दाखल करणे म्हणजे केवळ टॅक्स भरणे नव्हे, तर ते तुमच्या वार्षिक उत्पन्नाचे सरकारदरबारी असलेले अधिकृत प्रमाणपत्र आहे. आजच्या डिजिटल युगात प्राप्तिकर विभाग AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि डेटा ॲनालिटिक्सचा वापर करून तुमच्या प्रत्येक व्यवहारावर लक्ष ठेवून असतो. आयटीआर भरल्यामुळे तुमच्या उत्पन्नाची स्पष्ट नोंद राहते आणि भविष्यातील कायदेशीर कटकटी टळतात.
अनेकदा बँकेतील मुदत ठेवींचे व्याज, लाभांश किंवा फ्रीलान्स कामातून मिळणाऱ्या मानधनावर बँका किंवा संस्था टीडीएस कापतात. तुमचे उत्पन्न करमर्यादेपेक्षा कमी असले, तरी कापलेला हा पैसा परत मिळवण्यासाठी (Refund) आयटीआर दाखल करणे अनिवार्य आहे. विवरणपत्र भरल्याशिवाय तुम्हाला हा परतावा मिळू शकत नाही.
भविष्यात गृहकर्ज (Home Loan), वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना बँका गेल्या ३ वर्षांच्या आयटीआरची मागणी करतात. आयटीआरमुळे तुमची कर्ज फेडण्याची क्षमता सिद्ध होते, परिणामी कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होते आणि काही वेळा चांगल्या व्याजदराचा लाभही मिळतो.
तुम्हाला परदेशात फिरायला जायचे असेल किंवा उच्च शिक्षणासाठी जायचे असेल, तर व्हिसा अर्जासोबत मागील ३ ते ५ वर्षांचे आयटीआर जोडणे आवश्यक असते. अनेक देश आर्थिक स्थिती तपासण्यासाठी या कागदपत्राची मागणी करतात. आयटीआर नसेल तर व्हिसा मिळवण्यात अडचणी येऊ शकतात.
प्राप्तिकर विभागाकडे आता AIS (वार्षिक माहिती विवरण) आणि TIS (करदाता माहिती सारांश) द्वारे तुमच्या सर्व मोठ्या व्यवहारांची माहिती असते. जर तुम्ही विवरणपत्र भरले नाही आणि तुमच्या खात्यात मोठे व्यवहार दिसत असतील, तर डेटा विसंगतीमुळे विभागाकडून नोटीस येण्याची शक्यता असते. नियमित आयटीआर भरल्यास तुमची आर्थिक प्रतिमा (Financial Profile) मजबूत राहते.
कर शून्य असला तरी आयटीआर भरणे ही एक 'गुड फायनान्शिअल प्रॅक्टिस' आहे. यामुळे तुम्ही केवळ नियमांचे पालन करत नाही, तर तुमची भविष्यातील आर्थिक कामे अधिक सुलभ करता.