मुंबई: प्रसिद्ध टीव्ही शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात सायबर गुन्हेगारांच्या तावडीत सापडली आहे. 'ब्ल्यू डार्ट' या नामवंत कुरिअर कंपनीच्या नावाने करण्यात आलेल्या एका सायबर हल्ल्यात वनिताचे व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यानंतर हॅकर्सनी तिच्या नावाचा गैरवापर करत मित्र-परिवाराकडून तब्बल ६२ हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वनिताने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना आणि नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, भामट्यांनी 'ब्ल्यू डार्ट' कुरिअर सेवा पुरवण्याच्या बहाण्याने वनिताशी संपर्क साधला. एका अज्ञान व्यक्तीने तिला वारंवार फोन करून एका विशिष्ट क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले. वनिताने विश्वासाने तो नंबर डायल केला आणि अवघ्या काही सेकंदांतच तिचे व्हॉट्सॲप अकाऊंट आपोआप लॉगआऊट झाले. हॅकर्सनी तिच्या फोनवर 'कॉल फॉरवर्डिंग' (Call Forwarding) सेवा सक्रिय करून तिचे सर्व येणारे कॉल्स स्वतःच्या नंबरवर वळवले. यामुळे वनिताला कोणाशीही संपर्क साधता आला नाही आणि हॅकर्सनी तिच्या अकाऊंटचा पूर्ण ताबा मिळवला.
मित्रांची झाली आर्थिक फसवणूक
व्हॉट्सॲपचा ताबा मिळवताच हॅकर्सनी वनिताच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. "मी सध्या खूप मोठ्या अडचणीत अडकले आहे, मला तातडीने आर्थिक मदतीची गरज आहे. कृपया मला ६२ हजार रुपये पाठवा," असा मेसेज हॅकर्सनी सर्वांना पाठवला. वनिता खरोखरच एखाद्या मोठ्या संकटात सापडली असावी, या काळजीपोटी तिच्या काही मित्रांनी कोणताही खातरजमा न करता हॅकर्सनी दिलेल्या बँक खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले.
आपली फसवणूक झाल्याचे आणि अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच वनिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात तिने संपूर्ण घटनेचा थरार सांगत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. "माझ्या नावाने कोणालाही पैशांचे मेसेज आल्यास तात्काळ दुर्लक्ष करा किंवा मला दुसऱ्या नंबरवर संपर्क साधा," असे तिने स्पष्ट केले आहे.
नागरिकांसाठी सायबर तज्ज्ञांचा सल्ला:
कोणत्याही अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून फोनवरून कोणतेही कोड (उदा. 21 किंवा #002#) किंवा नंबर डायल करू नका.
कुरिअर किंवा कोणत्याही सेवेच्या नावाने आलेले संशयास्पद कॉल्स व मेसेज तात्काळ ब्लॉक करा.
व्हॉट्सॲप सुरक्षेसाठी 'Two-Step Verification' नेहमी ऑन ठेवा.
जवळच्या व्यक्तीने अचानक पैशांची मागणी केल्यास प्रथम त्यांना थेट फोन करून खातरजमा करा.