UPI पेमेंट फेल? ५ मिनिटांत समजून घ्या रिफंडची सोपी प्रक्रिया 
Arth Warta

UPI पेमेंट फेल अन् पैसे कट? जाणून घ्या रिफंडचे सोपे नियम

Google Pay, PhonePe अन् Paytm वर तक्रार नोंदवण्याची सोपी पद्धत आणि रिझर्व्ह बँकेचे रिफंड नियम

Prachi Tadakhe

आजच्या डिजिटल युगात टपरीवरील चहापासून ते मोठ्या खरेदींपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ म्हणजेच यूपीआय (UPI) द्वारे होत आहेत. पूर्वी घराबाहेर पडताना पैशांचे पाकीट सांभाळावे लागे, आता हातात मोबाईल असला की काम भागते. यूपीआयमुळे व्यवहार सोपे झाले असले, तरी कधी-कधी ‘पेमेंट फेल’ झाल्यामुळे नागरिकांची मोठी पंचाईत होते. बँकेतून पैसे कट झाल्याचा मेसेज येतो; पण समोरच्या व्यक्तीला पैसे मिळत नाहीत. अशा वेळी बहुतेक नागरिक घाबरून जातात आणि घाईघाईत पुन्हा पैसे पाठवण्याची चूक करतात.

अशा परिस्थितीत ग्राहकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि आपले पैसे सुरक्षित कसे परत मिळवावेत, याचा हा सविस्तर आढावा.

सर्वात आधी 'ही' चूक टाळा!

जर तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले असतील आणि समोरच्याला ते मिळाले नसतील, तर लगेच दुसऱ्यांदा पेमेंट करण्याची चूक अजिबात करू नका. यामुळे एकाच व्यवहारासाठी दोनदा पैसे जाण्याचा धोका असतो. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) आकडेवारीनुसार, बहुतेक अपयशी ठरलेल्या यूपीआय व्यवहारांचे पैसे ६० मिनिटांच्या आत ग्राहकांच्या खात्यात आपोआप जमा होतात.

यूपीआय व्यवहार अपयशी का होतो?

व्यवहार फेल होण्यामागे प्रामुख्याने खालील तांत्रिक व व्यावहारिक कारणे असतात:

  • तांत्रिक अडचणी: बँकेच्या सर्व्हरवर येणारा ताण, इंटरनेटचा मंद वेग किंवा NPCI कडून सुरू असलेले तांत्रिक अपडेट्स.

  • चुकलेली माहिती: चुकीचा यूपीआय पिन (UPI PIN) किंवा चुकीचा व्हीपीए (VPA / UPI ID) टाकणे.

  • मर्यादा संपणे: खात्यात पुरेशी शिल्लक नसणे किंवा बँकेने ठरवून दिलेली दैनंदिन व्यवहार मर्यादा (दिवसाला जास्तीत जास्त २० व्यवहार किंवा १ लाख रुपये) ओलांडली जाणे.

पेमेंट फेल झाल्यास काय करावे?

पैसे त्वरित जमा न झाल्यास सर्वात आधी संबंधित ॲपमधील ‘Transaction History’ मध्ये जाऊन फेल झालेल्या व्यवहारावर क्लिक करा. तेथे Check Status किंवा Raise Concern / Dispute हा पर्याय निवडा.

  • Google Pay: Profile --> Help & Feedback --> Select Transaction --> Issue with transaction.

  • PhonePe: Help --> Select Issue --> Payment Related Issue --> Amount Debited.

  • Paytm: Help & Support --> Payment Issues --> Report an issue.

(टीप: तक्रार नोंदवताना तुमचा १२ अंकी UTR / Transaction ID आणि स्क्रीनशॉट जवळ ठेवा.)

ॲपद्वारे प्रश्न न सुटल्यास तुमच्या बँकेच्या यूपीआय कस्टमर केअरशी संपर्क साधा. त्यांना १२ अंकी ट्रान्सझॅक्शन रेफरन्स नंबर, तारीख, वेळ आणि रकमेचा तपशील देऊन तक्रार निवारण क्रमांक (Complaint Reference Number) मिळवून ठेवा.

रिफंडची मुदत अन् विलंब शुल्क नियम

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नियमांनुसार पैसे परत मिळण्याचा कालावधी व्यवहाराच्या प्रकारानुसार निश्चित करण्यात आला आहे.

  • व्यक्ती ते व्यक्ती (P2P) व्यवहार: जर दोन व्यक्तींमधील व्यवहार अपयशी ठरला असेल, तर पुढील कामाच्या १ दिवसाच्या आत (T+1 Day) पैसे खात्यात परत मिळणे बंधनकारक आहे.

  • व्यक्ती ते व्यापारी (P2M) व्यवहार: जर तुम्ही एखाद्या दुकानदाराला किंवा व्यापाऱ्याला पेमेंट करत असाल, तर पैसे परत मिळण्यासाठी जास्तीत जास्त ५ कामाचे दिवस (T+5 Days) लागू शकतात.

  • विलंब झाल्यास दंडाची तरतूद: रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या या मुदतीनंतर पैसे परत मिळाल्यास, बँकेला ग्राहकाला दररोज १०० रुपये याप्रमाणे भरपाई देणे बंधनकारक आहे.

३० दिवसांत समस्या न सुटल्यास 'आरबीआय'कडे जा!

जर तुम्ही नोंदवलेल्या तक्रारीचे निवारण ३० दिवसांच्या आत संबंधित बँक किंवा यूपीआय ॲपने केले नाही, तर ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या एकात्मिक लोकपाल योजनेअंतर्गत (Integrated Ombudsman Scheme) थेट तक्रार नोंदवू शकतात. यासाठी रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत cms.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन तक्रार दाखल करता येते.

SCROLL FOR NEXT