जुनं पॅन कार्ड हरवलं म्हणून नवीन काढलंय? मग हा १०,००० रुपयांचा दंड फक्त तुमच्यासाठीच आहे! 
Arth Warta

सावधान! दोन पॅन कार्ड म्हणजे कायदेशीर १०,००० रुपयांचा दंड

प्राप्तिकर कायद्याचं 'कलम २७२बी' नक्की काय आहे? घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अतिरिक्त पॅन कार्ड बंद करण्याची सोपी ट्रिक.

Prachi Tadakhe

पगार जमा होण्यापासून ते बँकेत खाते उघडण्यापर्यंत आणि कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारापर्यंत, आजच्या डिजिटल युगात पॅन कार्ड (PAN Card) हे आपल्या आर्थिक अस्तित्वाचे सर्वात महत्त्वाचे साधन बनले आहे. मात्र, हेच छोटेसे ओळखपत्र तुमच्यासाठी मोठ्या कायदेशीर अडचणीचे कारण ठरू शकते, याची कल्पना कदाचित अनेकांना नसेल. नकळत किंवा माहितीच्या अभावामुळे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बाळगणे हा प्राप्तिकर विभागाच्या नजरेत एक गंभीर गुन्हा आहे. अशा निष्काळजीपणामुळे थेट १०,००० रुपयांचा आर्थिक दंड किंवा त्याहूनही गंभीर म्हणजे तुरुंगवासाची हवा खावी लागू शकते.

कायदा काय सांगतो? (कलम २७२बी चा बडगा)

प्राप्तिकर कायद्याच्या कलम २७२बी (Section 272B) नुसार, संपूर्ण भारतात कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्या नावावर केवळ एकच पॅन क्रमांक बाळगण्याची परवानगी आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे दोन सक्रिय पॅन कार्ड्स आढळली, तर कायद्यानुसार १०,००0 रुपयांचा थेट दंड ठोठावला जाऊ शकतो.

एवढेच नव्हे, तर या दोन वेगवेगळ्या पॅन कार्ड्सचा वापर करून कर चुकवेगिरी करण्याचा किंवा बँकांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाल्यास, थेट तुरुंगवासाची कठोर कारवाई देखील होऊ शकते.

अनेकदा लोक मुद्दामहून गुन्हा करत नाहीत. जुने पॅन कार्ड हरवल्यामुळे किंवा नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक झाल्यामुळे, नागरिक जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती करण्याऐवजी थेट नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची चूक करतात. अशा वेळी सिस्टीममध्ये एकाच व्यक्तीच्या नावावर दोन वेगवेगळे पॅन क्रमांक जनरेट होतात आणि नागरिक नकळत कायद्याच्या कचाट्यात सापडतात.

तुमच्या पॅन कार्डवरील १० अंकी 'गुपित कोड'चा अर्थ काय?

पॅन कार्डवर असलेला १० अंकी अल्फान्यूमेरिक (अक्षरे आणि अंक) क्रमांक हा केवळ रँडम नंबर नसून, ती तुमच्या आर्थिक आयुष्याची कुंडली आहे:

  • पहिली ३ अक्षरे: इंग्रजी वर्णमालेतील AAA ते ZZZ मधील कोणतीही तीन अक्षरे संगणकाद्वारे रँडमली निवडली जातात.

  • चौथे अक्षर (स्टेटस): हे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही वैयक्तिक करदाते असाल तर इथे 'P' (Person) असते, कंपनीसाठी 'C' (Company) आणि ट्रस्टसाठी 'T' (Trust) लिहिलेले असते.

  • पाचवे अक्षर: हे तुमच्या आडनावाचे पहिले अक्षर असते (उदा. आडनाव 'अग्रवाल' असेल तर पाचवे अक्षर 'A' असेल).

  • पुढील ४ अंक आणि शेवटचे अक्षर: हे आयकर विभागाच्या सिस्टीमद्वारे स्वयंचलित पद्धतीने निश्चित केले जाते.

घरबसल्या अतिरिक्त पॅन कार्ड ऑनलाइन कसे रद्द करायचे?

जर तुमच्याकडेही चुकून दोन पॅन कार्ड्स जमा झाली असतील, तर वेळेत सावध होऊन अतिरिक्त कार्ड विभागाकडे जमा करणे हाच एकमेव सुरक्षित मार्ग आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून घरबसल्या डिजिटल पद्धतीने पूर्ण करता येते:

  1. अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: सर्वात आधी 'Protean' (पूर्वीचे NSDL) किंवा 'UTIITSL' च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

  2. योग्य पर्याय निवडा: तिथे उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी 'Changes or Correction in PAN Data' हा पर्याय निवडा.

  3. मुख्य पॅन नमूद करा: अर्ज भरताना, जे पॅन कार्ड तुम्हाला भविष्यात सुरू ठेवायचे आहे, त्याचा प्रामुख्याने उल्लेख करा.

  4. दुसरे कार्ड रद्द करा: फॉर्ममध्ये खाली 'इतर पॅन कार्ड रद्द करा' (Cancellation of PAN) असा रकाना दिसेल. तिथे तुम्हाला जे कार्ड बंद करायचे आहे त्याचा क्रमांक लिहून फॉर्म ऑनलाइन सबमिट करा.

पॅन कार्ड हे केवळ ओळखपत्र नसून तुमची आर्थिक ओळख आहे. त्यामुळे त्याचा मूळ नंबर नेहमी 'डिजीलॉकर'सारख्या सुरक्षित ठिकाणी सेव्ह ठेवा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत किंवा असुरक्षित ठिकाणी पॅन कार्डची झेरॉक्स किंवा फोटो शेअर करणे टाळा; कारण याचा गैरवापर करून तुमच्या नावावर बँकांची बनावट कर्जे काढली जाण्याचा मोठा धोका असतो.

जर तुमच्याकडे दोन कार्ड असतील, तर कायदेशीर कारवाईची वाट न पाहता स्वेच्छेने पुढे येऊन अतिरिक्त कार्ड रद्द करा आणि संभाव्य दंडापासून स्वतःला सुरक्षित ठेवा.

SCROLL FOR NEXT