Saving असूनही Investment नसेल तर? 
Arth Warta

Saving असूनही Investment नसेल तर? – पैसा असूनही भविष्य असुरक्षित?

फक्त बचत करून आर्थिक सुरक्षितता मिळत नाही; महागाईवर मात करण्यासाठी नियोजित गुंतवणूक आवश्यक आहे. आज घेतलेला आर्थिक निर्णय उद्याच्या पिढीचं भविष्य ठरवतो.

Prachi Tadakhe

आपण रोज सकाळी कामावर जातो, तासन्‌तास मेहनत करतो, वेळ, ऊर्जा आणि कौशल्य खर्च करतो—फक्त एका कारणासाठी, पैसा कमावण्यासाठी. महिन्याच्या शेवटी हातात आलेल्या पगारातून खर्च भागवून उरलेली रक्कम बँक खात्यात जमा केली जाते. त्या क्षणी मनात समाधानाची भावना निर्माण होते—“चला, बचत तर होते आहे.” पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो—फक्त बचत पुरेशी आहे का? आजच्या बदलत्या आर्थिक वास्तवात याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे.

जसं साचलेलं पाणी वापरात आणलं नाही तर ते हळूहळू कुजतं, दुर्गंधी निर्माण करतं आणि शेवटी निरुपयोगी ठरतं, तसंच पैसा फक्त खात्यात पडून राहिला तर तोही हळूहळू निष्क्रिय होतो. तो दिसायला सुरक्षित वाटतो, पण प्रत्यक्षात तो एका अदृश्य शत्रूशी झुंज देत असतो ते म्हणजे महागाईशी.

महागाई: शांतपणे पैसा खाणारा राक्षस

महागाई म्हणजे केवळ दरवाढ नाही; ती आपल्या पैशाची खरेदी करण्याची ताकद कमी करणारी प्रक्रिया आहे. आपण ही घसरण रोज अनुभवतो, पण तिचं गांभीर्य लक्षात घेत नाही.
उदाहरण अतिशय साधं आहे—सात वर्षांपूर्वी १० रुपयांत एक लिटर पिण्याचं पाणी मिळत होतं. आज त्याच १० रुपयांत अर्धा लिटर पाणी मिळतं. याचा अर्थ काय?

मागील सात वर्षांत महागाईमुळे पैशाची खरेदी शक्ती जवळपास ५० टक्क्यांनी घटली. म्हणजेच तुमच्या १० रुपयांपैकी ५ रुपये महागाईने गिळंकृत केले.

हीच गोष्ट अन्नधान्य, शिक्षण, आरोग्यसेवा, घरभाडं, वाहतूक—सगळ्याच बाबतीत घडते आहे.

बँक खाते: सुरक्षित पण पुरेसं नाही

बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबांचा पहिला आर्थिक सल्ला असतो—“पैसा बँकेत ठेवा, सुरक्षित असतो.” हे अंशतः खरं आहे. पैसा सुरक्षित असतो, पण प्रश्न असा आहे—तो वाढतो का?
साधारणपणे बचत खात्यावर मिळणारा व्याजदर ३ ते ४ टक्के असतो, तर महागाईचा दर ६ ते ७ टक्क्यांच्या आसपास असतो. याचा अर्थ असा की खात्यातील रक्कम आकड्यांमध्ये वाढते, पण प्रत्यक्षात तिची किंमत कमी होत असते. हा फरक अनेकांना जाणवत नाही आणि हीच सर्वात मोठी आर्थिक चूक ठरते.

पैसा असूनही स्वप्नं अपूर्ण का राहतात?

घर खरेदी, मुलांचे उच्च शिक्षण, लग्न, निवृत्तीनंतरचा आरामदायी आयुष्य—ही सगळी स्वप्नं दीर्घकालीन असतात. पण जर पैसा फक्त साठवून ठेवला, योग्य ठिकाणी गुंतवला नाही, तर काय होतं?
१०–१५ वर्षांनी खात्यात रक्कम असते, पण ती अपुरी ठरते. खर्च अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी वाढलेला असतो. तेव्हा अनेकांच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं—“इतका पैसा कमावूनही काहीच जमलं नाही.” ही भावना केवळ आर्थिक अपयशाची नसून मानसिक अस्वस्थतेचीही असते.

बचत आणि गुंतवणूक: दोन्ही आवश्यक

बचत आणि गुंतवणूक यांची तुलना अनेकदा केली जाते, पण प्रत्यक्षात त्या स्पर्धक नाहीत, तर पूरक आहेत.

  • बचत आपल्याला सुरक्षितता देते

  • गुंतवणूक आपल्याला वाढ देते

योग्य आर्थिक नियोजनात दोन्हींचा समतोल असणं आवश्यक आहे. मात्र नियम एकच—बचतीपैकी मोठा भाग दीर्घकालीन गुंतवणुकीकडे वळला पाहिजे.

अनेक लोक गुंतवणुकीपासून दूर राहतात कारण त्यांना धोका वाटतो. प्रत्यक्षात गुंतवणूक म्हणजे धोका स्वीकारणं नव्हे, तर धोका व्यवस्थापित करणं आहे. योग्य नियोजन, विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवला, तर गुंतवणूक ही आर्थिक स्थैर्याचा सर्वात प्रभावी मार्ग ठरते.

गुंतवणुकीत वेळेला फार मोठं महत्त्व आहे. जितक्या लवकर गुंतवणूक सुरू होते, तितका फायदा जास्त होतो. चक्रवाढ व्याज (Compounding) हा असा जादुई परिणाम आहे की जो पैसा हळूहळू, पण निश्चितपणे वाढवतो.
पाच-दहा वर्षांचा विलंब म्हणजे भविष्यातील मोठ्या संधी गमावणं.

आर्थिक शिस्त म्हणजे स्वातंत्र्य

पैसा योग्य ठिकाणी गुंतवला, तर तो तुमच्यासाठी काम करतो. अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पैशासाठी काम करावं लागतं. आर्थिक शिस्त म्हणजे कडक बंधन नव्हे, तर आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग आहे.

आजच्या काळात फक्त पैसा कमावणं पुरेसं नाही, तो समजून, नियोजनपूर्वक आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणं तितकंच महत्त्वाचं आहे. महागाई हा शांतपणे पण सातत्याने पैसा कमी करणारा राक्षस आहे. त्याच्याशी लढायचं असेल, तर गुंतवणूक ही पर्याय नाही—ती अपरिहार्य गरज आहे.आज घेतलेला एक छोटासा आर्थिक निर्णय उद्याच्या पिढ्यांचं भविष्य सुरक्षित करू शकतो.

SCROLL FOR NEXT