ना सुरक्षा रक्षक, ना अलार्म; सांगलीवाडीतील घटनेने उघड झाला एटीएम यंत्रणेचा फोलपणा. 
Arth Warta

सांगली हादरली! १२ लाखांच्या रोकडसह अख्खं एटीएम पळवलं

सुरक्षा रक्षक गायब, कॅमेरे रामभरोसे; बँकांच्या हलगर्जीपणावर सांगलीकरांचा संताप!

Prachi Tadakhe

सांगली: बँकिंग सेवांचा विस्तार गल्लोगल्ली झाला असला, तरी या आर्थिक केंद्रांची सुरक्षा मात्र पुरती 'रामभरोसे' राहिली आहे, याचा प्रत्यय सांगलीत पुन्हा एकदा आला आहे. सांगलीवाडी येथील पतंगराव कदम कॉलेजसमोरील एका गाळ्यातून चोरट्यांनी तब्बल ११ लाख ८४ हजार ८०० रुपयांच्या रोकडसह १ लाख ५० हजार रुपयांचे संपूर्ण एटीएम मशीनच मुळापासून उखडून पळवून नेले. मंगळवार, १५ सप्टेंबरच्या सायंकाळपासून ते बुधवार, १६ सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान हा धाडसी दरोडा पडला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, बँका आणि खासगी कंपन्यांच्या बेजबाबदार कारभारावर आता तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सांगलीवाडी येथील जे. ई. पवार गाळा नंबर ०२ मध्ये 'एनसीआर कॉर्पोरेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीचे एटीएम सेंटर आहे. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास या गाळ्यात प्रवेश करून एटीएमच्या सर्व केबल्स तोडल्या आणि संपूर्ण मशीनच पळवून नेले. या मशीनमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे ९ लाख ८४ हजार रुपये आणि १०० रुपयांच्या नोटांचे ५० हजार ८०० रुपये असे एकूण १० लाख ३४ हजार ८०० रुपये होते. मशीन आणि रोकड असा एकूण ११ लाख ८४ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

याप्रकरणी विकास विश्वनाथ आमनगी (वय ३५, रा. कोरोची, इचलकरंजी) यांच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथकासह घटनास्थळी धाव घेतली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे.

ही घटना केवळ एक चोरी नसून, बँका आणि एटीएम कंपन्यांच्या सुरक्षेबाबतच्या उघड्या पडलेल्या फोलपणाचे जिवंत उदाहरण आहे. सांगली शहर आणि ग्रामीण भागात शेकडो एटीएम सेंटर्स कार्यरत आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश ठिकाणी:

  • सुरक्षा रक्षक गायब: २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असणे बंधनकारक असताना, खर्चात कपात करण्यासाठी रक्षकच ठेवले जात नाहीत.

  • नादुरुस्त यंत्रणा: अनेक केंद्रांमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतात, अलार्म सिस्टीम कार्यन्वित नसते आणि प्रवेशद्वारांची रचना अतिशय तकलादू असते.

  • भक्कम पायाचा अभाव: एटीएम मशीन जमिनीला ज्या प्रकारे फिक्स (अँकर) केले जाणे गरजेचे असते, त्यातही अनेकदा हलगर्जीपणा केला जातो; ज्यामुळे चोरटे ते सहजरीत्या उखडून नेऊ शकतात.

वेळ आता केवळ तपासाची नाही, तर कारवाईची!

ग्राहकांकडून विविध सेवांचे शुल्क वसूल करणाऱ्या बँकांना या आर्थिक केंद्रांची सुरक्षा भक्कम करण्याचे भान उरलेले नाही. सांगलीवाडीतील घटनेने व्यापारी वर्ग आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केवळ कागदी नोटिसा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत.

पोलीस प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून चालवल्या जाणाऱ्या अशा असुरक्षित एटीएम केंद्रांचा तात्काळ सर्व्हे केला जावा. ज्या केंद्रांवर सुरक्षा रक्षक, कार्यरत सीसीटीव्ही आणि धोक्याची सूचना देणारे अलार्म नाहीत, त्यांना नोटीस देऊन थेट एटीएम सेवा खंडित करण्याची कडक कारवाई केली पाहिजे.

बँकांनी केवळ नफा न पाहता ग्राहकांचा विश्वास आणि या मालमत्तेची सुरक्षा जपली पाहिजे. अन्यथा, 'रामभरोसे' चालणाऱ्या या यंत्रणांमुळे गुन्हेगारांचे धाडस असेच वाढत राहील, यात शंका नाही.

SCROLL FOR NEXT