रत्नागिरीत ज्येष्ठ नागरिकाची १.६८ लाखांची ऑनलाईन फसवणूक; टिळक आळी परिसरातील घटना 
Arth Warta

पेन्शनच्या नावाखाली १.६८ लाखांचा वृद्धाला गंडा!

फोनवर बँक डिटेल्स किंवा OTP शेअर करू नका; पोलिसांचे नागरिकांना तात्काळ सतर्क राहण्याचे आवाहन.

Prachi Tadakhe

रत्नागिरी: पेन्शन कार्ड अद्ययावत (अपडेट) करून देण्याच्या बहाण्याने एका अज्ञात सायबर भामट्याने ८३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील टिळक आळी येथे राहणारे कौस्तुभ श्रीनिवास गोरे (वय ४३) यांनी या संदर्भात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ९ जुलै रोजी त्यांच्या ८३ वर्षीय वृद्ध वडिलांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. समोरील व्यक्तीने पेन्शन कार्ड अपडेट करायचे असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

बँकेशी संबंधित गोपनीय माहिती किंवा ओटीपी (OTP) च्या माध्यमातून सायबर चोरट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यात डल्ला मारला. वृद्ध वडिलांच्या बँक खात्यातून तब्बल १ लाख ६८ हजार ५०० रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळवून ते लंपास करण्यात आले. खात्यातून पैसे वळते झाल्याचे लक्षात आल्यानंतर गोरे कुटुंबाला आपली फसवणूक झाल्याचे समजले.

या घटनेमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि डिजिटल बँकिंग साक्षरतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बँकिंग तज्ज्ञ आणि पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की:

  • कोणत्याही बँकेचे अधिकारी किंवा प्रतिनिधी फोनवर पेन्शन कार्ड, केवायसी (KYC) किंवा पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी गोपनीय माहिती मागत नाहीत.

  • मोबाईलवर आलेला कोणताही ओटीपी (OTP) किंवा बँक खात्याचा पासवर्ड अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नये.

  • अशी फसवणूक झाल्यास त्वरित '१९३०' या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर किंवा स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा.

सध्या रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, ज्या खात्यांवर पैसे वळवण्यात आले आहेत, त्यांचा तांत्रिक तपास सुरू केला आहे.

SCROLL FOR NEXT