फक्त एक 'APK' फाईल अन् १३ लाख गायब! पनवेलमधील गॅस ग्राहकांनो, 'हा' मेसेज आलाय का? 
Arth Warta

गॅस कंपनीच्या नावाखाली १३ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

गुगल प्ले स्टोअरबाहेरील ॲप्स डाउनलोड करणे पडले महागात; सायबर पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.

Prachi Tadakhe

पनवेल: डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस अधिक क्लिष्ट आणि भयंकर होत चालले आहेत. गॅस कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून मोबाईलवर एक घातक 'APK' (Android Package Kit) फाईल पाठवून पनवेलमधील दोन वेगवेगळ्या ग्राहकांना तब्बल १३ लाख २२ हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस सायबर सेलच्या मदतीने पुढील तपास करत आहेत.

पहिली घटना पनवेल शहरातील लोकमान्यनगर भागात घडली. येथील एका नामांकित सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणाच्या मोबाईलवर अज्ञात सायबर भामट्यांनी एका गॅस कंपनीच्या नावाने संपर्क साधला. त्यानंतर त्याला मोबाईलवर एक 'APK' फाईल लिंकद्वारे पाठवली.

काहीतरी अधिकृत काम असावे, या समजुतीने संबंधित तरुणाने ती फाईल आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केली. मात्र, फाईल डाउनलोड होताच त्याचा मोबाईल हॅक झाला. काही वेळातच त्याच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख ९७ हजार रुपये वेगवेगळ्या अज्ञात बँक खात्यांमध्ये वळते करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

दुसरी घटना खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर ११ मध्ये घडली. येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त वृद्धाला सायबर गुन्हेगारांनी आपले भक्ष्य बनवले. एका अज्ञात इसमाने वृद्धाला फोन करून आपण गॅस कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. गॅसच्या कोणत्यातरी 'सेवा शुल्कासाठी' (Service Charge) फक्त १२ रुपये भरायचे आहेत, असे भासवून वृद्धाचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर मोबाईलवर व्यवहार पूर्ण करण्यासाठी एक 'APK' फाईल पाठवण्यात आली. वृद्धाने ती फाईल डाउनलोड करताच, त्यांच्या बँक खात्याचा संपूर्ण ताबा हॅकर्सकडे गेला. यानंतर त्यांच्या खात्यातून तब्बल ७ लाख २५ हजार रुपये परस्पर लंपास करण्यात आले. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

'APK' फाईल म्हणजे काय?

सामान्यतः आपण गुगल प्ले स्टोअरवरून सुरक्षित ॲप्स डाउनलोड करतो. मात्र, 'APK' फाईल्स या अशा फाईल्स असतात ज्या थेट लिंकद्वारे मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्या जातात. एकदा का ही फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड झाली, की सायबर गुन्हेगारांना तुमच्या मोबाईलचे स्क्रीन रेकॉर्डिंग, मेसेज (OTP) आणि बँक खात्याचे पासवर्ड्स चोरणे सहज शक्य होते.

या वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पनवेल पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे:

  • कोणत्याही अज्ञात क्रमांकावरून आलेल्या .apk फॉरमॅटमधील फाईल्स डाउनलोड करू नका.

  • गॅस बिल, वीज बिल किंवा इतर कोणत्याही सेवेच्या नावाखाली केवळ काही रुपयांचे पेमेंट करण्यासाठी येणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका.

  • बँकेची गोपनीय माहिती किंवा ओटीपी (OTP) कोणाशीही शेअर करू नका.

  • फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा.

पनवेल आणि खांदेश्वर पोलीस सध्या या दोन्ही प्रकरणांतील बँक खात्यांचे तपशील आणि तांत्रिक बाबी तपासून आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, नागरिकांनी स्वतःहून जागरूक राहणे हाच या सायबर धोक्यांपासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे.

SCROLL FOR NEXT