सावधान! आधी विश्वास जिंकतात, मग लाखो उकळतात; पालघरमधील निवृत्त बँक कर्मचाऱ्याला ४८ लाखांचा फटका! 
Arth Warta

सोशल मीडियावरील 'तो' व्हिडिओ पडला ४८ लाखांना...

...पण पालघर सायबर पोलिसांच्या एका 'स्मार्ट मूव्ह'मुळे ३८ लाख रुपये खात्यातच झाले लॉक!

Prachi Tadakhe
  • डहाणू/पालघर: सोशल मीडियावरील आकर्षक गुंतवणुकीच्या आणि मोठ्या परताव्याच्या (Returns) आमिषाला बळी पडून तब्बल ४८ लाख रुपयांची फसवणूक झालेल्या एका ७० वर्षीय निवृत्त बँक कर्मचाऱ्याला पालघर सायबर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच झालेल्या तातडीच्या हालचाली आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी तक्रारदाराचे ३८ लाख २१ हजार ९७४ रुपये सायबर भामट्यांच्या बँक खात्यातच गोठविले (Freeze) आहेत. पोलिसांच्या या तत्परतेमुळे पीडित वृद्धाची मोठी रक्कम परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नेमके काय घडले?

डहाणू येथील रहिवासी असलेले ७० वर्षीय सेवानिवृत्त बँक कर्मचारी रामचंद्र वळवी हे २५ मे २०२६ रोजी सोशल मीडिया स्क्रोल करत होते. यादरम्यान त्यांच्यासमोर गुंतवणुकीवर भरघोस परतावा देणारी एक व्हिडिओ जाहिरात (चित्रफीत) आली. बँक क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असूनही, सायबर भामट्यांच्या हुशार भूलथापांना बळी पडून त्यांनी जाहिरातीमधील संबधित व्यक्तींशी संपर्क साधला आणि पैसे गुंतवण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला सायबर भामट्यांनी वळवी यांना विश्वासात घेण्यासाठी त्यांनी गुंतवलेल्या छोट्या रकमांवर चांगला नफा मिळाल्याचे आभासी (Digital) स्वरूपात दाखवले. हा परतावा पाहून वळवी यांचा विश्वास बसला. एकदा विश्वास संपादन केल्यानंतर, भामट्यांनी विविध तांत्रिक कारणांचे आणि वेगवेगळ्या चार्जेसचे निमित्त पुढे करून वळवी यांच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण ४८ लाख ५३ हजार २०९ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांवर भरून घेतले. जेव्हा रामचंद्र वळवी यांनी आपली हक्काची रक्कम आणि नफा परत मागण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना कोणताच परतावा मिळाला नाही. उलट आणखी पैशांची मागणी होऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आपली आयुष्यभराची पुंजी गमावल्याचे समजताच वळवी यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घोलवड पोलीस ठाण्यात धाव घेतली. घोलवड पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ पालघर सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. सायबर गुन्ह्यांमध्ये सुरुवातीचे काही तास (Golden Hour) अत्यंत महत्त्वाचे असतात, कारण या काळात पैसे इतर खात्यांमध्ये डायव्हर्ट होण्याची शक्यता जास्त असते.

पालघर सायबर पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता तात्काळ तांत्रिक तपास सुरू केला. ज्या बँक खात्यांमध्ये वळवी यांनी पैसे पाठवले होते, त्या खात्यांचा माग काढून पोलिसांनी संबंधित बँकेशी संपर्क साधला आणि भामट्यांच्या खात्यात अडकलेले ३८ लाख २१ हजार ९७४ रुपये तात्काळ फ्रीज केले. ४८ लाख ५३ हजार २०९ रुपयांच्या एकूण फसवणुकीपैकी तब्बल ३८ लाखाहून अधिक रक्कम वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे.

पालघर सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

या धडक कारवाईनंतर पालघर सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी गुंतवणुकीच्या जाहिरातींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. 'कमी काळात दुप्पट पैसे' किंवा 'घरबसल्या मोठ्या परताव्याचे' आमिष दाखवणाऱ्या लिंक्स व व्हिडिओपासून सावध राहा. जर दुर्दैवाने अशी फसवणूक झालीच, तर तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा, जेणेकरून पैसे भामट्यांच्या हाती लागण्यापूर्वीच गोठवणे शक्य होईल.

SCROLL FOR NEXT