एप्रिल २०२६ पासून 'हे' ४ नवीन फॉर्म लागू होणार 
Arth Warta

पॅन कार्ड अर्जाच्या नियमांत मोठे बदल; एप्रिल २०२६ पासून 'हे' ४ नवीन फॉर्म लागू होणार

एक देश, चार फॉर्म' – भारतीय आणि परदेशी नागरिकांसाठी पॅन अर्जाची प्रक्रिया आता बदलली.

Prachi Tadakhe

नवी दिल्ली: प्राप्तीकर विभागाने कायम खाते क्रमांक म्हणजेच 'पॅन' (PAN) कार्ड संदर्भातील नियमांत मोठे बदल केले असून, एप्रिल २०२६ पासून नवीन प्रणाली लागू होणार आहे. करदात्यांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी जुने फॉर्म ४९ए (49A) आणि ४९एए (49AA) बंद करून त्याजागी आता फॉर्म ९३, ९४, ९५ आणि ९६ हे चार नवीन अर्ज सादर करण्यात आले आहेत.

कोणासाठी कोणता फॉर्म?

नवीन रचनेनुसार अर्जदारांचे चार गटांत वर्गीकरण करण्यात आले आहे:

  • फॉर्म ९३: भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तींसाठी.

  • फॉर्म ९४: भारतीय कंपन्या किंवा भारतात नोंदणीकृत संस्थांसाठी.

  • फॉर्म ९५: परदेशी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींसाठी.

  • फॉर्म ९६: भारताबाहेर नोंदणीकृत संस्था किंवा परदेशी संस्थांसाठी.

काय आहेत नवीन बदल?

नवीन अर्ज प्रणाली आयकर नियम १९६२ च्या नियम १५८ आणि कलम २६२ अंतर्गत अधिसूचित करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने खालील सुधारणा केल्या आहेत:

१. अनिवार्य तपशील: संपर्क माहितीसाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणे आता बंधनकारक आहे.

२. आईचे नाव अनिवार्य: अर्जामध्ये आईचे नाव नमूद करणे आता आवश्यक करण्यात आले आहे.

३. रहिवासी स्थिती: अर्जात रहिवासी, अनिवासी किंवा सामान्यतः रहिवासी नसलेले अशा स्पष्ट श्रेणी निवडता येतील.

४. सुटसुटीत मांडणी: अर्जातील अनावश्यक माहिती आणि फील्ड्स काढून टाकण्यात आली असून, ओळख पटवण्यासाठी छायाचित्राचा आकार मोठा ठेवण्यात आला आहे.

भारतीय नागरिकांच्या बाबतीत, आधार कार्डवर नाव नसल्यास पूर्ण नाव लिहिणे बंधनकारक असेल. या बदलांमुळे पॅन वाटप प्रक्रियेतील त्रुटी कमी होऊन करदात्यांना अधिक वापरकर्ता-अनुकूल अनुभव मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

SCROLL FOR NEXT