रेल्वे स्टेशनवर आलेल्या 'त्या' अज्ञात मेसेजचे रहस्य काय? मुंबई पोलीस चक्रावले. 
Arth Warta

पेन्शन कार्ड ॲपच्या नावाखाली दीड लाखांचा गेम!

रेल्वे स्टेशनवर आलेल्या एका फोन कॉलने बदलले आयुष्य; बँकेचा बनावट अधिकारी आणि पेन्शन कार्डचे मायाजाल

Prachi Tadakhe

मुंबई: डिजिटल युगात सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस गडद होत चालले असून, आता पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिक त्यांच्या रडारवर आले आहेत. पेन्शन कार्ड मिळवून देण्याच्या बहाण्याने एका अज्ञात सायबर भामट्याने ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून १ लाख ५० हजार रुपये लांबवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र धुरी (वय ६१) असे फसवणूक झालेल्या पीडित व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी २१ जून रोजी अंधेरी येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित राजेंद्र धुरी हे १२ जून रोजी त्यांच्या वृद्ध आईसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून मुंबईला परतण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले होते. ते ट्रेनची वाट पाहत असतानाच, त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एका अनोळखी नंबरवरून एक मेसेज आला. या मेसेजसोबत 'पेन्शन कार्ड एपीके फाईल' (Pension Card APK File) जोडलेली होती.

संबंधित सायबर भामट्याने आपल्या व्हॉट्सॲप प्रोफाइलवर एका नामांकित बँकेचा अधिकृत लोगो (Logo) लावला होता. यामुळे धुरी यांचा गैरसमज झाला आणि हा मेसेज बँकेकडूनच आला असावा, असा त्यांचा ठाम विश्वास बसला. त्यानंतर काही वेळातच त्यांना दुसऱ्या एका क्रमांकावरून फोन आला. फोनवरील अज्ञात व्यक्तीने स्वतःला 'बँकेचा प्रतिनिधी' असल्याचे भासवले आणि पेन्शन कार्ड सक्रिय करण्यासाठी व्हॉट्सॲपवर पाठवलेली फाईल डाऊनलोड करून त्यात माहिती भरण्यास सांगितले.

आईच्या पेन्शनच्या कामासाठी धुरी यांनी समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून ती 'एपीके' फाईल मोबाईलमध्ये ओपन केली. त्या फाईलमध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक आणि गोपनीय माहिती भरून अर्ज सबमिट केला. मात्र, ही फाईल म्हणजे सायबर चोरांनी तयार केलेले एक मालवेअर (Malware) होते. धुरी यांनी माहिती भरताच त्यांच्या मोबाईलचा ताबा आणि बँकेचे गोपनीय तपशील सायबर भामट्यांच्या हाती लागले.

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १३ जून रोजी धुरी हे मुंबईतील आपल्या घरी सुखरूप पोहोचले. मात्र, घरी पोहोचताच त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून तब्बल १,५०,००० रुपये वळते (डेबिट) झाल्याचा मेसेज आला. हा मेसेज पाहून धुरी यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधला असता, आपली फसवणूक झाल्याचे आणि खात्यातून पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे समजताच धुरी यांनी सर्वप्रथम सायबर हेल्पलाईनवर (1930) संपर्क साधून तक्रार नोंदवली. त्यानंतर २१ जून रोजी त्यांनी अंधेरी येथील डी. एन. नगर पोलीस ठाणे गाठून रीतसर फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BJS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.

सायबर तज्ज्ञांचे आवाहन: 'APK' फाईल धोक्याची घंटा!

आजकाल सायबर भामटे वीज बिल, पेन्शन, लॉटरी किंवा अपडेटच्या नावाखाली व्हॉट्सॲपवर .apk फॉरमॅट असलेल्या फाईल्स पाठवतात. या फाईल्स म्हणजे एक प्रकारचे अनधिकृत ॲप्स असतात. ते मोबाईलमध्ये इन्स्टॉल करताच बँक खात्याचे पासवर्ड, ओटीपी (OTP) आणि इतर माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते.

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेली फाईल किंवा लिंक ओपन करू नका.

  • बँकेचे कोणतेही व्यवहार किंवा ॲप्स नेहमी गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) वरूनच डाऊनलोड करा.

  • कोणत्याही बँकेचा प्रतिनिधी फोनवर गोपनीय माहिती किंवा ॲप डाऊनलोड करायला सांगत नाही, हे लक्षात ठेवा.

SCROLL FOR NEXT