मुंबई: आर्थिक वर्ष २०२५-२६ (कर निर्धारण वर्ष २०२६-२७) साठी वैयक्तिक करदात्यांना विनादंड आयकर विवरणपत्र (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत आज, म्हणजेच ३१ जुलै २०२६ रोजी संपत आहे. अनेकदा तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची अपूर्णता किंवा वेळेअभावी काही करदात्यांकडून ही मुदत चुकण्याची शक्यता असते. मात्र, ३१ जुलैची मुदत टळली म्हणजे आयकर परतावा भरण्याची संधी कायमची गेली, असे अजिबात नाही.
आयकर कायदा, २०२५ मधील तरतुदींनुसार करदात्यांना मुदतीनंतरही 'विलंबित विवरणपत्र' (Belated ITR), 'सुधारित विवरणपत्र' (Revised ITR) आणि 'अद्ययावत विवरणपत्र' (Updated ITR - ITR U) भरण्याचे पर्याय उपलब्ध आहेत.
आयकर कायदा, २०२५ नुसार महत्त्वाच्या कालमर्यादा
जर तुम्ही ३१ जुलैची मुदत चुकवली असेल, तर विविध प्रकारचे आयटीआर भरण्यासाठी कायद्याने ठरवून दिलेल्या कालमर्यादा खालीलप्रमाणे आहेत:
पहिला पर्याय म्हणजे विलंबित विवरणपत्र (Belated ITR), जे कलम २६३ (४) अंतर्गत संबंधित कर वर्ष संपल्यापासून ९ महिन्यांच्या आत किंवा करनिर्धारण पूर्ण होण्यापूर्वी, यापैकी जे आधी असेल त्या वेळेत दाखल करता येते.
दुसरा पर्याय सुधारित विवरणपत्र (Revised ITR) हा असून, कलम २६३ (५) नुसार संबंधित कर वर्ष संपल्यापासून १२ महिन्यांच्या आत किंवा करनिर्धारण पूर्ण होण्यापूर्वी ते भरता येते.
तसेच तिसरा पर्याय अद्ययावत विवरणपत्र (ITR-U) चा असून, कलम २६३ (६) अंतर्गत संबंधित कर वर्ष संपल्यानंतरच्या आर्थिक वर्षापासून ४८ महिन्यांच्या (४ वर्षे) आत करदात्यांना ते दाखल करता येते.
उशिरा आयटीआर भरण्याचे ५ मोठे तोटे:
१. विलंब शुल्क (Late Fees): मुदतीनंतर आयटीआर भरल्यास प्राप्तिकर नियमांनुसार विलंब शुल्क भरावे लागते.
२. व्याजाचा भुर्दंड: कर देयता बाकी असल्यास थकबाकीवर दरमहा ठरलेले व्याज लागू होते.
३. तोटा पुढे नेण्यास बंदी: चालू वर्षातील व्यावसायिक किंवा भांडवली तोटा पुढील वर्षात क्लेम करण्यासाठी 'कॅरी फॉरवर्ड' करता येत नाही.
४. रिफंड मिळण्यास विलंब: तुमचा कर परतावा (Tax Refund) येण्यास जास्त वेळ लागतो आणि त्यावर मिळणारे व्याजही कमी होऊ शकते.
५. कायदेशीर नोटिसांचा धोका: वेळेत कर न भरल्यास आयकर विभागाकडून कर आकारणी आणि चौकशीच्या नोटिसा येण्याची शक्यता वाढते.
जर तुमची ३१ जुलैची मुदत चुकली असेल, तर घाबरून न जाता दंडासह लवकरात लवकर विलंबित आयटीआर भरून घेणे हाच आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचा मार्ग ठरेल!
(टीप: हा लेख सर्वसामान्य माहितीसाठी असून, आयटीआर भरताना आपल्या सीए किंवा कर सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)