IPL मॅच की बँक खात्याला कात्री? तिकीट हातात येण्यापूर्वीच उडतोय बँक बॅलन्स; 'या' अदृश्य चोरांपासून सुटका कशी? 
Arth Warta

IPL Ticket Scam: आयपीएलचे तिकीट हातात येण्यापूर्वीच उडतोय बँक बॅलन्स

फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग आणि स्वस्त पासेसच्या नादात पासवर्ड आणि क्रिप्टो वॉलेट चोरीला; जाणून घ्या स्वतःला वाचवण्याचा मार्ग.

Prachi Tadakhe

आयपीएल २०२६ चा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे. मैदानातील चौकार-षटकारांच्या आतषबाजीत क्रिकेट चाहते बुडाले असतानाच, दुसरीकडे सायबर विश्वात एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. "फ्री आयपीएल तिकीट", "स्वस्त पासेस" आणि "मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग" या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी थेट क्रिकेट चाहत्यांच्या खिशावर दरोडा टाकण्यास सुरुवात केली आहे.

प्रसिद्ध सायबर सुरक्षा कंपनी CloudSEK च्या ताज्या अहवालानुसार, आयपीएल २०२६ दरम्यान तब्बल ६०० हून अधिक बनावट तिकीट वेबसाइट्स आणि ४०० पेक्षा जास्त मालवेअर लिंक्स सक्रिय झाल्या आहेत. तुमचे बँक खाते रिकामे करण्यासाठी आणि मोबाईलमधील वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी सायबर ठगांनी रचलेले हे जाळे नक्की काय आहे आणि यापासून कसे वाचाल, याचा हा सविस्तर आढावा.

भारतात आयपीएल हा केवळ एक खेळ नसून तो एक उत्सव आहे. तिकीट मिळवण्यासाठीची धावपळ आणि शेवटच्या क्षणी सीट मिळवण्याची धडपड याचाच फायदा या सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे.

  • क्लोन प्लॅटफॉर्म: ठगांनी BookMyShow आणि District सारख्या नामांकित अधिकृत तिकीट प्लॅटफॉर्मची हुबेहूब नक्कल (Clone) केली आहे. वेबसाइटचा रंग, डिझाइन, फॉन्ट आणि लेआउट इतका हुबेहूब आहे की, डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत सामान्य माणसाची फसवणूक होते.

  • सायकोलॉजिकल ट्रिक्स: ग्राहकांवर दबाव आणण्यासाठी या फेक साईट्सवर "Limited Seats", "Last Few Tickets" किंवा एक Countdown Timer (उलट मोजणी) दाखवली जाते. यामुळे घाईगडबडीत चाहते विचार न करता पेमेंट करतात.

  • सोशल मीडियावरून जाहिरात: या बनावट वेबसाइट्सचा प्रसार करण्यासाठी Instagram Reels, Facebook Ads आणि अगदी Google Search च्या स्पॉन्सर्ड लिंक्सचा सढळहस्ते वापर केला जात आहे.

चाहत्यांना फसवण्याची ही पद्धत अत्यंत पद्धतशीर आणि संघटित आहे:

१. पेमेंट आणि फेक तिकीट: जेव्हा एखादा युझर या साईटवर जाऊन UPI किंवा क्रेडिट/डेबिट कार्डने पेमेंट करतो, तेव्हा त्याच्या मोबाईलवर QR कोड आणि सीट नंबर असलेले एक आकर्षक PDF तिकीट पाठवले जाते. ते पाहिल्यावर तिकीट खरे असल्याचा भास होतो.

२. स्टेडियमवर सत्य समोर: आपली फसवणूक झाल्याचे चाहत्याला थेट स्टेडियमच्या गेटवर गेल्यावरच समजते. तिथे असलेला स्कॅनर तो QR कोड स्वीकारत नाही आणि बुकिंग आयडी पूर्णपणे बनावट असल्याचे सुरक्षा रक्षकांकडून सांगितले जाते. पैसे तर जातातच, पण सामन्याचा आनंदही हिरावला जातो.

ठगांचे 'ऑपरेशन डॅशबोर्ड'

तज्ज्ञांच्या मते, या सायबर गुन्हेगारांकडे स्वतःचे एक अत्याधुनिक 'ऑपरेशन डॅशबोर्ड' आहे. सामन्याच्या लोकप्रियतेनुसार (उदा. प्लेऑफ किंवा हाय-व्होल्टेज मॅचेस) ते तिकिटांचे दर रीअल-टाइम बदलतात आणि ग्राहकांचा गोळा झालेला डेटा पुढील मोठ्या फसवणुकीसाठी वापरतात.

'फ्री आयपीएल लाईव्ह'च्या नावाखाली डिव्हाइस हॅक

केवळ तिकिटांचे पैसेच नाही, तर महागड्या सबस्क्रिप्शनपासून वाचण्यासाठी जे लोक इंटरनेटवर "Free IPL Live Streaming" शोधतात, तेही या ठगांच्या रडारवर आहेत.

Telegram, Reddit आणि WhatsApp वर मॅचच्या नावाखाली संशयास्पद लिंक्स फिरत आहेत. या लिंकवर क्लिक केल्यावर मॅच तर सुरू होत नाहीच, पण बॅकग्राउंडला "SHub Stealer" नावाचा धोकादायक मालवेअर युझरच्या डिव्हाइसमध्ये (विशेषतः MacBook आणि लॅपटॉपमध्ये) घुसवला जातो. हा मालवेअर तुमच्या ब्राउझरमधील सेव्ह केलेले पासवर्ड, बँकिंग डिटेल्स, Telegram Session, कुकीज आणि क्रिप्टो वॉलेटची माहिती थेट चोरांपर्यंत पोहोचवतो.

कोट्यवधी प्रेक्षक, काही तासांत होणारे अब्जावधींचे ऑनलाइन व्यवहार आणि सामन्यांबद्दलची प्रचंड क्रेझ यामुळे आयपीएल हा सायबर गुन्हेगारांसाठी एक मोठा 'बिझनेस' बनला आहे. विशेषतः प्लेऑफ आणि फायनलच्या काळात चाहते कोणतीही रिस्क घ्यायला तयार असतात आणि नेमका याच मानसिकतेचा गैरफायदा सायबर टोळ्या घेतात.

सायबर तज्ज्ञांनी क्रिकेट चाहत्यांसाठी खालील अत्यंत महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत:

  • फक्त अधिकृत प्लॅटफॉर्म: आयपीएलची तिकिटे फक्त आणि फक्त अधिकृत तिकीट भागीदार (Official Ticketing Partners) किंवा आयपीएलच्या अधिकृत वेबसाइटवरूनच खरेदी करा.

  • अनोळखी लिंक्स टाळा: WhatsApp, Telegram किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या "अर्ध्या किमतीत तिकीट" किंवा "फ्री लाईव्ह स्ट्रीमिंग"च्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

  • URL तपासा: कोणतीही पेमेंट करण्यापूर्वी वेबसाइटची URL (उदा. https:// सुरक्षित आहे का आणि स्पेलिंग बरोबर आहे का) नीट तपासा.

  • Two-Factor Authentication (2FA): तुमच्या सर्व बँकिंग ॲप्स, ईमेल आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन नेहमी सुरू ठेवा.

  • ॲप परमिशन्स: मोबाईलमध्ये कोणतेही अनोळखी थर्ड-पार्टी ॲप डाउनलोड करू नका आणि त्यांना गॅलरी किंवा एसएमएसची परवानगी देऊ नका.

आयपीएलचा थरार नक्की अनुभवा, पण एका चुकीच्या क्लिकमुळे तुम्ही केवळ आयपीएलचे तिकीटच गमावणार नाही, तर तुमचा संपूर्ण डिजिटल डेटा आणि बँक खाते धोक्यात येऊ शकते. 'सावध राहा, सुरक्षित राहा!'

SCROLL FOR NEXT