७७ कोटींची सायबर फसवणूक 
Arth Warta

सायबर गुन्हेगारांचा 'गेम ओव्हर'; ७७ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

३७५ गुन्ह्यांचे धागेदोरे उघड; १६ संशयितांना बेड्या, २६० 'म्युल' बँक खात्यांद्वारे व्हायचे काळे व्यवहार

Prachi Tadakhe

अहमदाबाद: देशभरात पसरलेल्या एका मोठ्या सायबर फसवणूक रॅकेटचा गुजरात सीआयडीच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स'ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ७७ कोटी रुपयांचा अपहार उघडकीस आला असून, गुजरात आणि गोवा पोलिसांनी संयुक्तपणे छापेमारी करत १६ अट्टल संशयितांना अटक केली आहे.

अशी झाली कारवाई:

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सीआयडीने गोवा, बडोदा आणि पालनपूर येथे एकाच वेळी छापे टाकले. यामध्ये गोव्यातून ९, बडोद्यातून ५ आणि पालनपूरमधून २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन, चेकबुक, पासबुक, सिम कार्ड, राऊटर आणि क्यूआर कोड यांसारखे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

काय आहे 'म्युल' बँक खात्यांचे जाळे?

तपासात असे समोर आले आहे की, आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे २६० हून अधिक 'म्युल' (दुसऱ्यांच्या नावे असलेली) बँक खाती तयार केली होती. या खात्यांचा वापर देशभरातील ३७५ सायबर गुन्ह्यांमधील पैसे वळवण्यासाठी केला जात असे. आरोपी स्वतःच्या किंवा आर्थिक आमिष दाखवून इतरांच्या नावे खाती उघडून त्यांचे लॉगइन तपशील दुबईसह इतर देशांतील गुन्हेगारांना पुरवत होते.

परदेशातील कनेक्शन आणि बनावट कंपन्या:

या टोळीने व्यवहारांचा मागमूस लागू नये म्हणून तीन बनावट कंपन्या देखील स्थापन केल्या होत्या. आरोपींचे दुबईतील सूत्रधारांशी व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामद्वारे सतत संपर्क असल्याचे तपासात उघड झाले आहे. ऑनलाइन गेमिंग आणि इतर सायबर घोटाळ्यांतील पैसा याच खात्यांच्या जाळ्याद्वारे परदेशात पाठवला जात असल्याचे स्पष्ट झाले असून, पोलीस आता या प्रकरणातील अधिक खोलवर तपास करत आहेत.

SCROLL FOR NEXT