सोन्याने पुन्हा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेच्या नसांवर हात ठेवला आहे. दररोज नवे उच्चांक गाठणाऱ्या सोन्याच्या दरांमुळे कोल्हापुरातील आर्थिक व्यवहारांमध्ये एक वेगळाच विरोधाभास दिसून येत आहे. एकीकडे सराफ बाजारात दागिन्यांची विक्री मंदावली आहे, तर दुसरीकडे सोन्यावर कर्ज घेण्याची प्रक्रिया एकसारखी सुरु असून सुरू असून बँका आणि गोल्ड फायनान्स कंपन्यांच्या तिजोऱ्या अक्षरशः ओसंडून वाहत आहेत.
सध्या कोल्हापुरातील राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका आणि खासगी वित्तसंस्था “आमच्याकडे सोने ठेवायला जागा नाही” अशी स्थिती उघडपणे मान्य करत आहेत. या अभूतपूर्व स्थितीमागे एकच कारण पुढे येत आहे—‘गोल्ड रोटेशन’.
सोन्याचे दर वाढले की ग्राहक खरेदी टाळतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत चित्र उलटे आहे. दागिन्यांची विक्री कमी झाली असली, तरी सोने खरेदी मात्र तेजीत आहे. कोल्हापुरातील अनेक गुंतवणूकदार स्वतःकडील जुने दागिने किंवा सोने बँकेत तारण ठेवतात. त्यातून मिळणाऱ्या रकमेचा वापर करून ते तात्काळ सोन्याची नाणी किंवा बिस्किटे खरेदी करतात. दर आणखी वाढले की ही खरेदी विकून कर्जाची परतफेड केली जाते आणि फरकातून नफा कमावला जातो.
या व्यवहारात कागदावर सोन्याची मागणी कमी दिसते; पण प्रत्यक्षात सोन्याची उलाढाल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळेच सराफ बाजारात शांतता असूनही तिजोऱ्यांमध्ये सोन्याचा साठा वाढत चालला आहे.
पूर्वी सुवर्ण कर्ज हे आपत्कालीन गरजांसाठी घेतले जायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. व्याजदर किती आहेत, हा मुद्दा दुय्यम ठरला असून सोन्याच्या दरवाढीतून किती परतावा मिळेल, यावरच लक्ष केंद्रित केले जात आहे, असे बँकिंग क्षेत्रातील जाणकार सांगतात.
सोन्याच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे अल्प कालावधीत मोठा नफा मिळेल, या अपेक्षेने अनेक जण हा मार्ग स्वीकारत आहेत. परिणामी सुवर्ण कर्जाचा वापर गरजेपेक्षा गुंतवणुकीसाठी अधिक होऊ लागला आहे.
ही स्थिती दीर्घकाळ टिकणारी नसल्याचे लक्षात आल्याने आता बँकांनी सावध भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. अनेक बँकांनी नवीन सुवर्ण कर्ज प्रस्ताव स्वीकारण्यास मर्यादा घातल्या आहेत. काही ठिकाणी कर्जमर्यादा कमी करण्यात आली आहे, तर काही बँकांनी मुदतपूर्व नूतनीकरण करून वाढीव रक्कम घेण्यावर निर्बंध आणले आहेत.
बँक अधिकाऱ्यांच्या मते, सोन्याच्या दरात अचानक घसरण झाल्यास बँकांच्या तारण मूल्यात मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे जोखीम टाळण्यासाठी हे कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत.
सोन्याच्या पाकिटांचा साठा वाढल्याने आता तिजोरी व्यवस्थापन हा गंभीर प्रश्न बनला आहे. यावर तोडगा म्हणून अनेक मोठ्या गोल्ड फायनान्स कंपन्यांनी अनधिकृतरीत्या २ लाख रुपयांपेक्षा कमी रकमेचे सुवर्ण कर्ज देणे थांबवले आहे.
यामुळे छोट्या गरजांसाठी सुवर्ण कर्ज घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची अडचण वाढली आहे. संस्थांचा कल आता मोठ्या कर्ज व्यवहारांकडे वळल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
आर्थिक तज्ज्ञांच्या मते, सोने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सुरक्षित असले तरी अल्पकालीन दरवाढीवर आधारित ही रणनीती धोकादायक ठरू शकते. जागतिक घडामोडी, डॉलरचा चढ-उतार किंवा मध्यवर्ती बँकांचे धोरण बदलले, तर सोन्याचे दर झपाट्याने खाली येऊ शकतात.
आज तिजोऱ्या भरलेल्या असल्या, तरी उद्या परिस्थिती उलटी झाली, तर हा ‘सोने तारण – सोने खरेदी’चा खेळ अनेकांना महागात पडू शकतो, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.