जर तुम्हाला एफडीमधून जास्तीत जास्त परतावा हवा असेल, तर गुंतवणूक करताना खालील ५ चुका आवर्जून टाळा:
व्याजदरांची तुलना न करणे: बहुतांश लोक केवळ एकाच बँकेत (विशेषतः जिथे खाते आहे तिथे) थेट एफडी करतात. मात्र, स्मॉल फायनान्स बँका आणि नवीन खासगी बँका मोठ्या सरकारी किंवा प्रस्थापित बँकांच्या तुलनेत ०.५०% ते १.५०% जास्त व्याज देतात. दीर्घकाळासाठी ही रक्कम लाखांच्या फरकात रूपांतरित होते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी विविध बँकांच्या व्याजदरांची तुलना करणे आवश्यक आहे.
पैशांचे विभाजन करून वेगवेगळ्या एफडी करा : सर्व रक्कम एकाच दीर्घ मुदतीच्या एफडीमध्ये गुंतवणे अयोग्य ठरू शकते. त्याऐवजी 'एफडी लॅडरिंग' (FD Laddering) तंत्राचा वापर करा. म्हणजेच, १, २ आणि ३ वर्षांसाठी वेगवेगळ्या एफडी करा . यामुळे दरवर्षी तुमची एक एफडी मॅच्युअर होईल आणि बाजारातील तत्कालीन उच्च व्याजदरांचा लाभ उठवणे सोपे जाईल.
कराचे गणित (Tax Implications) दुर्लक्षित करणे: एफडीवरील व्याज पूर्णपणे करमुक्त नसते. एका मर्यादेपेक्षा जास्त व्याज असल्यास बँक १०% TDS कापते. तुम्ही करपात्र स्लॅबमध्ये येत नसल्यास, वेळेवर Form 15G / 15H जमा करून हा टॅक्स कपात होण्यापासून वाचवू शकता.
मुदतपूर्व पैसे काढणे (Premature Withdrawal): आणीबाणीच्या काळात मुदतीपूर्वी एफडी मोडल्यास बँका ०.५% ते १% पर्यंत दंड आकारतात. हे टाळण्यासाठी फक्त तितकीच रक्कम एफडीमध्ये टाका ज्याची लगेच गरज भासणार नाही. पर्याय म्हणून 'स्वीप-इन' (Sweep-in) सुविधेचा वापर करा, जेणेकरून गरजेनुसार दंड न भरता पैसे काढता येतील.
महागाई दराचा (Inflation) विचार न करणे: जर महागाईचा दर ६% असेल आणि तुमची एफडी ७% व्याज देत असेल, तर तुमचा वास्तविक नफा केवळ १% असतो. जर एफडीचा व्याजदर महागाईपेक्षा कमी असेल, तर पैशाचे खरे मूल्य (Purchasing Power) कमी होते. त्यामुळे महागाईवर मात करेल असाच कार्यकाळ आणि व्याजदर निवडणे गरजेचे आहे.
थोडक्यात काय तर... एफडी हा सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम मार्ग असला तरी योग्य नियोजन आणि माहितीच्या आधारे घेतलेला निर्णयच तुम्हाला अधिक आर्थिक लाभ मिळवून देऊ शकतो.