नवी दिल्ली: तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचा पीएफ (PF) कापला जात असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पीएफचे पैसे काढण्यासाठी आता लांबलचक अर्जांची आणि दिवसांच्या प्रतीक्षेची गरज भासणार नाही. केंद्र सरकार EPFO 3.0 ही नवीन प्रणाली लागू करण्याच्या तयारीत असून, यामुळे पीएफ खातेधारकांना थेट ATM किंवा UPI द्वारे पैसे काढता येणे शक्य होणार आहे.
अनेकदा आपत्कालीन परिस्थितीत पीएफचे पैसे मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठ्या कसरती कराव्या लागतात. मात्र, EPFO 3.0 अंतर्गत सरकार संपूर्ण यंत्रणा डिजिटल आणि हायटेक करत आहे. या नवीन व्यवस्थेत पीएफ खाते तुमच्या बँक खात्यासारखेच काम करेल, जिथून तुम्ही गरजेनुसार त्वरित रक्कम काढू शकाल.
पीएफ हा कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा आधार असल्याने, सरकार पैसे काढण्यावर काही तांत्रिक मर्यादा ठेवणार आहे:
५०% मर्यादा: मिळालेल्या माहितीनुसार, सभासद त्यांच्या एकूण जमा रकमेपैकी साधारण ५० टक्क्यांपर्यंत रक्कम त्वरित काढू शकतील.
सुरक्षितता: ही रक्कम एकाच वेळी पूर्ण काढता येणार नाही. उर्वरित ५०% रक्कम ही निवृत्तीच्या काळासाठी सुरक्षित ठेवली जाईल.
UPI मर्यादा: UPI द्वारे व्यवहार करताना जशी बँकेची मर्यादा असते, तशीच मर्यादा पीएफ खात्यासाठीही निश्चित केली जाईल.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पीएफ काढण्याचे मूलभूत नियम बदललेले नाहीत, तर प्रक्रिया बदलली आहे.
१. वेगवान प्रक्रिया: पूर्वी पैसे खात्यात जमा व्हायला आठवडा किंवा महिना लागायचा, आता ते काम काही मिनिटांत होईल.
२. पात्रता: उपचार, लग्न, शिक्षण किंवा घर खरेदी यांसारख्या कारणांसाठी जे जुने नियम होते, तेच लागू राहतील. तुमच्या पात्रतेनुसारच तुम्हाला पैसे काढता येतील.
३. पारदर्शकता: नवीन प्रणालीमुळे क्लेम रिजेक्शनचे (Claim Rejection) प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण पीएफ रक्कम काढण्यासाठीचे नियम पूर्वीप्रमाणेच राहतील. जर सभासद निवृत्त झाला असेल किंवा दोन महिन्यांहून अधिक काळ बेरोजगार असेल, तरच त्याला पूर्ण रक्कम काढता येईल. दैनंदिन गरजा किंवा आपत्कालीन स्थितीसाठी फक्त ५० टक्क्यांपर्यंतच रक्कम उपलब्ध असेल.
EPFO 3.0 चे मुख्य उद्दिष्ट 'प्रतीक्षा काळ' संपवणे हे आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे तातडीने उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. लवकरच यासंदर्भातील अधिकृत नियमावली आणि तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.