स्क्रीनवर पोलीस, हातात बनावट पत्र; ६१ वर्षीय वृद्धाची ८ दिवसांत ५९ लाखांची लूट! 
Arth Warta

डिजिटल अरेस्ट'चा मायाजाल! सुप्रीम कोर्ट, सीबीआयच्या नावाखाली लाखांची लूट!

सांगली सायबर सेलने उद्ध्वस्त केली आंतरराज्य टोळी; दोन सराईत आरोपींच्या घरातून १८ डेबिट कार्ड्स आणि २४ चेकबुक्स जप्त

Prachi Tadakhe
  • तासगाव / सांगली: केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून, सर्वोच्च न्यायालय , सीबीआय आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नावाच्या खोट्या लेटरहेडचा वापर करून 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली तासगाव येथील एका सेवानिवृत्त वृद्धाला तब्बल ५९ लाख ९ हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सांगली सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुणे परिसरातून दोन सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सायबर गुन्ह्यांसाठी वापरले जाणारे मोठे साहित्य जप्त केले आहे.

सांगली सायबर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत पुणे परिसरातून दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१. अबू हुसेन समसुल आलम (वय ३८, सध्या रा. काळेपडळ रोड, हडपसर, पुणे; मूळ रा. बादुवा, जिल्हा मुशिर्दाबाद, पश्चिम बंगाल)

२. सुशील अकील राम (वय ३४, सध्या रा. सिझन मॉल समोर, मगरपट्टा, पुणे; मूळ रा. पश्चिम बंगाल)

हायप्रोफाईल 'डिजिटल अरेस्ट'चा बनाव असा उघड झाला...

पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, तासगाव तालुक्यातील सावळज येथील सुतार गल्लीत राहणारे ६१ वर्षीय सेवानिवृत्त व्यावसायिक अण्णासाहेब बाळगोंडा पाटील यांना जानेवारी २०२६ मध्ये या आंतरराज्य टोळीने लक्ष केले.

  • विश्वास संपादन करण्यासाठी पोलिसांचे डीपी: आरोपींनी फिर्यादी पाटील यांना बनवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप् (WhatsApp) प्रोफाइलवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो लावले होते. आपण सीबीआय, इन्कम टॅक्स किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी असल्याचे त्यांनी भासविले.

  • खोट्या लेटरहेडचा वापर: पाटील यांना आरोपींनी व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ कॉल करून मानसिक दबावाखाली आणले. तसेच 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया', 'सुप्रीम कोर्ट', 'इन्कम टॅक्स' आणि 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' (RBI) च्या नावाचे हुबेहूब दिसणारे खोटे पत्र पाठवून त्यांना एका गंभीर गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवली.

  • ८ दिवसांत ५९ लाखांची वसुली: या भीषण मानसिक दबावाखाली आणून आरोपींनी ८ जानेवारी ते १६ जानेवारी २०२६ या अवघ्या आठ दिवसांच्या कालावधीत पाटील यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल ५९ लाख ०९ हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला.

आरोपींच्या घरातून सायबर गुन्ह्यांचे मोठे साहित्य जप्त

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सांगली सायबर विभागाने तपासाची चक्र गतीमान केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी पुण्यातून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेतली असता, सायबर गुन्ह्यांसाठी बँक खाती पुरवणारे आणि व्यवहार हाताळणारे मोठे रॅकेट समोर आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

  • मोबाईल व सिमकार्ड: ४ मोबाईल फोन, ६ सिमकार्ड आणि ६ सिमकार्डची रिकामी पाकिटे.

  • बँकिंग साहित्य: विविध बँकांचे एकूण १८ डेबिट व क्रेडिट कार्ड्स, २४ चेक बुक्स आणि ६ पास बुक्स.

  • महत्त्वाचे दस्तऐवज: ओळख पटवण्यासाठी आणि खाती उघडण्यासाठी वापरण्यात आलेली ३ महत्त्वाची ओळखपत्रे (पॅन कार्ड व इतर वैयक्तिक कागदपत्रे).

  • सध्या देशामध्ये 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिक आणि सेवानिवृत्त व्यक्तींना टार्गेट करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. कोणतीही सरकारी यंत्रणा, सीबीआय, पोलीस किंवा रिझर्व्ह बँक कधीही व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलवर कोणालाही 'डिजिटल अरेस्ट' करत नाही किंवा पैशांची मागणी करत नाही. अशा धमक्यांना बळी न पडता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा केंद्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा, असे आवाहन सांगली पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • तासगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सायबर विभागाने केलेली ही कारवाई कौतुकास्पद मानली जात असून, या आंतरराज्य टोळीचे धागेदोरे देशातील इतर राज्यांशी जोडलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

SCROLL FOR NEXT