बिलात अजूनही थकबाकी दिसतेय? घाईघाईत क्रेडिट कार्ड बिल भरण्यापूर्वी जाणून घ्या हे नियम! 
Arth Warta

क्रेडिट कार्डने ऑनलाइन ऑर्डर रद्द केल्यानंतर बिलाची थकबाकी कशी हाताळावी?

रिफंड येण्यास ५ ते १४ दिवसांचा अवधी लागतो; अशा वेळी बिल भरावे की नाही? जाणून घ्या सविस्तर नियम.

Prachi Tadakhe

ऑनलाइन शॉपिंग करताना एखादी वस्तू पसंत न पडल्यास किंवा ऑर्डर रद्द केल्यास आपण ती परत करतो. अशा वेळी पैसे बँक खात्यात येण्याऐवजी ज्या माध्यमातून पेमेंट केले, त्याच क्रेडिट कार्ड खात्यात परत जमा होतात. मात्र, बऱ्याचदा परतावा (रिफंड) मंजूर झाल्यानंतरही क्रेडिट कार्डच्या बिलामध्ये ती थकबाकी कायम असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत ती रक्कम भरावी की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर मग, या संपूर्ण प्रक्रियेमागील गणित आणि अशा वेळी काय निर्णय घ्यावा, हे सविस्तरपणे समजावून घेऊया.

क्रेडिट कार्ड रिफंडची नेमकी प्रक्रिया कशी असते?

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून एखादी वस्तू खरेदी करता, तेव्हा बँक तुमच्या वतीने व्यापाऱ्याला (मर्चंटला) पैसे देते. त्यानंतर तुम्हाला बिलिंग सायकलनुसार निश्चित मुदतीत त्या कार्डचे पैसे भरावे लागतात.

जेव्हा तुम्ही ती ऑर्डर रद्द करता किंवा वस्तू परत करता, तेव्हा विक्रेता परताव्याची प्रक्रिया सुरू करतो. मात्र, हा परतावा मिळणे म्हणजे हातात थेट रोख रक्कम मिळणे असा होत नाही. ही रक्कम तुमच्या क्रेडिट कार्ड खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे तुमची एकूण थकबाकी कमी होते किंवा तुमची उपलब्ध क्रेडिट मर्यादा (Credit Limit) पूर्ववत होते. याउलट, युपीआय (UPI) किंवा कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे केलेल्या व्यवहारांचा परतावा थेट बँक खात्यात जमा होतो.

परतावा प्रलंबित असताना क्रेडिट कार्डचे बिल भरावे का?

पेमेंट नेटवर्कद्वारे पर्र्ताव्याची प्रक्रिया पूर्ण होऊन तो तुमच्या स्टेटमेंटमध्ये दिसण्यासाठी साधारणपणे ५ ते १४ दिवसांचा कालावधी लागू शकतो.

समजा, उद्या तुमच्या क्रेडिट कार्डचे बिलिंग होणार आहे आणि आजच तुम्हाला वस्तूचा परतावा मिळाला आहे, तर अशा वेळी नवीन स्टेटमेंटमध्ये मूळ खरेदीची रक्कम कायम असू शकते. अशा स्थितीत काय करावे?

  • संपूर्ण बिल भरा: तुमची देय तारीख (Due Date) जवळ आली असेल आणि परतावा अद्याप खात्यात जमा झाला नसेल, तर सुरक्षिततेचा उपाय म्हणून देय तारखेपर्यंत संपूर्ण बिल भरून टाकावे.

  • केवळ 'किमान देय रक्कम' (Minimum Due) भरल्यास उरलेल्या रकमेवर बँक भारी व्याज आकारू शकते आणि भविष्यातील खरेदीवरील 'व्याजमुक्त कालावधी' (Interest-free period) देखील गमावावा लागू शकतो.

रिफंड समायोजनाच्या ३ प्रमुख शक्यता

बिलिंग सायकलच्या कोणत्या टप्प्यावर तुम्हाला परतावा मिळाला आहे आणि तुम्ही आधीच बिल भरले आहे की नाही, यावर खात्याचे गणित अवलंबून असते:

  1. बिल तयार होण्यापूर्वी मिळालेला परतावा: बिलिंग सायकल संपण्यापूर्वी जर परतावा मिळाला, तर त्या महिन्याचे एकूण बिल तयार करताना खरेदीच्या रकमेतून ती रिफंडची रक्कम वजा केली जाते. परिणामी, बिलात मूळ रक्कम कमी होऊन येते.

  2. बिल तयार झाल्यानंतर मिळालेला परतावा: रिफंड येण्यापूर्वीच जर क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट तयार झाले असेल, तर ती परताव्याची रक्कम तुमच्या चालू थकबाकीतून समायोजित केली जाते. अशा वेळी तुम्हाला संपूर्ण बिल भरण्याऐवजी फक्त उरलेली उर्वरित रक्कम भरावी लागते.

  3. बिल भरल्यानंतर मिळालेला परतावा: परतावा मिळण्यापूर्वीच जर तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी भरली असेल, तर नियमांनुसार ती रक्कम समायोजित करण्यासाठी बँक किंवा कार्ड कंपनीला तुमची संमती घ्यावी लागते. तुम्ही संमती दिल्यास ती रक्कम आगामी बिलात समायोजित होते; परंतु तुम्ही नकार दिल्यास किंवा प्रतिसाद न दिल्यास, ती रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाऊ शकते.

रिवॉर्ड्स आणि कॅशबॅकवर काय परिणाम होतो?

  • रिवॉर्ड पॉईंट्स कपात: ज्या खरेदीवर तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स, एअर माइल्स किंवा कॅशबॅक मिळाला होता, ती ऑर्डर रद्द केल्यास किंवा रिफंड मिळाल्यास ते सर्व पॉईंट्स किंवा फायदे तुमच्या खात्यातून वजा (Debit) केले जातात.

  • वेल्कम बोनस धोक्यात: काही विशिष्ट कार्ड्सवर 'वेल्कम बोनस' मिळवण्यासाठी किमान खरेदीची अट असते. परताव्यामुळे जर तुमचा एकूण खर्च त्या मर्यादेपेक्षा कमी झाला, तर कार्डच्या अटींनुसार तो बोनस रद्द केला जाऊ शकतो.

  • पर्यायी मार्ग: तुमचे रिवॉर्ड्स सुरक्षित ठेवण्यासाठी, क्रेडिट कार्डवर रिफंड घेण्याऐवजी व्यापाऱ्याकडे 'स्टोर क्रेडिट' (Store Credit) मागणे हा एक पर्याय असू शकतो, जेणेकरून भविष्यात त्याच प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ती रक्कम वापरता येईल.

SCROLL FOR NEXT