त्रिशूर (केरळ) येथील मलंकारा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय करून सहकार क्षेत्रात आपले स्थान भक्कम केले आहे. या सोसायटीची स्थापना प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवी डॉ. बॉबी चेम्मनूर यांच्या पुढाकाराने झालेली होती, संस्थेने आपल्या प्रगतीत वाढ करताना आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे.
त्रिशूर येथील बिनी हेरिटेज येथे नुकत्याच झालेल्या १७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सोसायटीने आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला. सदस्यांच्या विश्वास व सहकार्याच्या पार्श्वभूमीवर सोसायटीने सदस्यांना ६ टक्के लाभांश जाहीर केला.
सोसायटीने दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण व्यवसाय उलाढाल ८९५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २३ टक्के वाढीव आहे. सदस्यसंख्या देखील ३५ टक्क्यांनी वाढून ८५,८०७ इतकी झालेली आहे. याशिवाय, सोसायटीने ७.११ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला असून नफ्यात सातत्यपूर्ण वाढ कायम राखली आहे. वार्षिक सभेनंतर अल्पावधीतच सोसायटीने १००० कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय टप्पा पार केलेला आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष सी. बी. जिसो होते. यावेळी संचालक थॉमस कोशी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवप्रकाश यांनी मार्गदर्शन केले. उपाध्यक्षा मरीअम्मा पियस यांनी आभार मानले.
भविष्यातील वाटचाल:
भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट करताना अध्यक्ष जिसो यांनी २०३० पर्यंत २५,००० कोटी रुपयांची व्यवसाय उलाढाल साध्य करण्याचे ध्येय जाहीर करून यासाठी दीर्घकालीन धोरणावर भर दिला जात असल्याचे सांगितले.
यावेळी सोसायटीने आपल्या वाढीच्या योजनेचा भाग म्हणून “मलंकारा मेंबर ॲप” लाँच केले आहे. या ॲपद्वारे ठेवी, कर्ज परतफेड आणि खात्यात त्वरित डिजिटल प्रवेश यासारख्या सुरक्षित सुविधा सदस्यांना मिळणार आहेत.
नवीन कर्ज योजना आणि सेवा:
संस्थेने तिरुवनंतपुरम, एर्नाकुलम आणि त्रिशूर येथील शाखांमध्ये विविध ग्राहकाभिमुख योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यात –
हिऱ्यांच्या दागिन्यांवर कर्ज योजना
मालमत्ता व वाहन कर्ज योजना
महिलांसाठी विशेष दुचाकी कर्ज योजना
वैयक्तिक कर्ज योजना
सूक्ष्म वित्त योजना
३० दिवसांपासून ते २५ वर्षांपर्यंतच्या "लवचिक ठेव योजना"
या नव्या योजना सदस्यांच्या आर्थिक सोयीसुविधा वाढविणाऱ्या ठरणार आहेत.