जालना येथील देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या सभेच्या उद्घाटन व मार्गदर्शनासाठी भोसला मिलिट्री स्कुल, नाशिकचे माजी कार्याध्यक्ष मा. प्रा. सी. ए. श्री. प्रकाशजी पाठक व प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब जालनाच्या अध्यक्षा मा. श्रीमती. वर्षादेवी सुरेंद्रकुमार पित्ती हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रीमती वर्षादेवी पित्ती मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, “लहानपणापासून राष्ट्रीयकृत बँकाच्या विचारात वाढलेलो आम्ही, आज आम्हाला या पतसंस्थेचे कार्य, पत, प्रभाव व संस्थेविषयी असलेले लोकांचे प्रेम कळाले. येथे आल्यावर संस्थेच्या व्यावसायिकतेपेक्षा एक पारिवारिक प्रेमाचा व आपले पणाचा भाव जाणवला.” तसेच संस्थेने गेल्या ३६ वर्षात जी प्रगती केली त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले व त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख असाच दिवसेंदिवस वाढत जावा अशा शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक श्री. प्रकाशजी पाठक म्हणाले, "फार कमी पतसंस्था अशा आहेत ज्या दीर्घ काळापर्यत काम करतात. त्यापैकी एक देवगिरी पतसंस्था आहे. पतसंस्थेचा उद्देश समाजाची पत वाढविणे हा असला पाहिजे. सहकाराविषयी माहिती सांगताना त्यांनी सामान्य व्यक्तीला अर्थ पुरवठा करून त्याला आर्थिक दृष्ट्या उभे करणे व त्याची पत सुधारणे हा उद्देश सहकाराचा आहे. तो उद्देश समोर ठेवून देवगिरी पतसंस्था ही सामान्य व्यक्तीचे सशक्तीकरण करून त्याला आत्मनिर्भर करण्याच्या अनुषंगाने कार्य करते आहे."
सभेत देवगिरी पतसंस्थेद्वारे निर्धारित करण्यात आले की, नुकतेच केंद्र सरकारने २०२५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केल्यामुळे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षा निमित्त संस्थेच्या प्रत्येक शाखेने या आर्थिक वर्षात १००० नवे सभासद जोडावेत, प्लास्टिक मुक्त धोरण व बर्तन बँक धोरण राबवावे. कार्यक्रमात संस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा व समाजात वैशिष्ट्यपूर्ण काम करण्याऱ्या सभासदांचा प्रमुख अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निमित्ताने जनकल्याण रक्तपेढी यांच्या मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सभासदांना पर्यावरण पूरक “ कापडी पिशवी, घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी, आमचा संकल्प प्लास्टिकमुक्त जालना’” असा संदेश असलेल्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले.