सणासुदीच्या दिवसांत वधारलेल्या खरेदीमुळे, लोकांच्या पसंतीच्या ठरलेल्या डिजिटल व्यवहारांचे माध्यम म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (यूपीआय) ऑक्टोबर मध्ये केलेल्या डिजिटल व्यवहारांमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. या माध्यमातून महिन्यात तब्बल २७.२८ लाख कोटी रुपये मूल्याचे आणि २०.७ अब्ज व्यवहार झाले आहेत. ही माहिती यूपीआय प्रणालीची प्रवर्तक नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) जारी केलेल्या आकडेवारीतून सोमवारी स्पष्ट झाली.
मूल्याच्या दृष्टीने या आधी मे महिन्यात २५.१४ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते, तर आकारमानाच्या बाबतीत ऑगस्टमधील २० अब्ज उलाढाली झाल्या होत्या. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये २३.४९ लाख कोटींचे व्यवहार झाले होते, त्यामुळे वार्षिक स्तरावर यूपीआय व्यवहार मूल्यांमध्ये १६% वाढ झाली आहे. महिना गणिक वाढही ९.५% इतकी नोंदवली गेली आहे.
NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, दसरा-दिवाळी सणांच्या काळात दररोज सरासरी ६६.८ कोटी व्यवहार झाले आणि या महिन्यात सरासरी उलाढाल ८७,९९३ कोटी रुपयांवर पोहोचली. डिजिटल व्यवहारांचा वाढता कल पाहता UPI हे देशातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय पेमेंट माध्यम बनले आहे.