तुमचे यूपीआय पेमेंट अचानक होईल ब्लॉक! 
Co-op Banks

तुमचे यूपीआय पेमेंट अचानक होईल ब्लॉक!

‘या’ चुका टाळा, अन्यथा ऐनवेळी होईल फजिती

Vijay chavan

डिजिटल व्यवहारांचा वेगाने वाढणारा वापर पाहता यूपीआय (UPI) हा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, या सोयीसोबत काही जोखमीही वाढल्या असून, छोट्याशा चुकीमुळे किंवा संशयास्पद व्यवहारामुळे तुमचे यूपीआय पेमेंट अचानक ब्लॉक होऊ शकते. त्यामुळे व्यवहार करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक ठरत आहे.

बँका आणि पेमेंट सिस्टीम्स सध्या अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने प्रत्येक व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. एखादा व्यवहार नेहमीच्या पॅटर्नपेक्षा वेगळा दिसला, अचानक मोठी रक्कम ट्रान्सफर झाली किंवा कमी वेळात अनेक व्यवहार झाले, तर प्रणाली त्याला संशयास्पद मानते. अशा वेळी ग्राहकाच्या सुरक्षेसाठी संबंधित खाते किंवा यूपीआय सेवा तात्पुरती ब्लॉक केली जाऊ शकते.

विशेषतः, नवीन डिव्हाइसवरून लॉग - इन करून मोठे व्यवहार करणे, वेगवेगळ्या शहरांतून किंवा बेभरवशाच्या ठिकाणांहून पेमेंट करणे, तसेच पेमेंट फेल झाल्यानंतर वारंवार प्रयत्न करणे या गोष्टी धोक्याच्या ठरू शकतात. अनेकदा ग्राहक नकळतपणे अशा चुका करतात आणि त्याचा फटका त्यांनाच बसतो.

याशिवाय, पेमेंट फेल झाल्यानंतर लगेचच पुन्हा पुन्हा ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केल्यास सिस्टीमला ते संशयास्पद वाटू शकते. परिणामी, खाते काही काळासाठी ब्लॉक होऊ शकते किंवा व्यवहारांवर मर्यादा येऊ शकते. त्यामुळे अशा वेळी थोडा वेळ थांबणे आणि आलेला 'एरर'चा मेसेज नीट वाचणे गरजेचे आहे.

जर समस्या सतत उद्भवत असेल, तर संबंधित बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधणे हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास खाते पुन्हा सुरळीत सुरू करता येते.

एकूणच, यूपीआय व्यवहार जितके सोपे आणि जलद आहेत, तितकेच ते सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांनीही काही मूलभूत नियम पाळणे गरजेचे आहे. थोडीशी काळजी घेतल्यास अचानक होणारे ब्लॉकेज आणि त्यातून निर्माण होणारी गैरसोय सहज टाळता येऊ शकते.

SCROLL FOR NEXT