पिन ऐवजी केवळ चेहरा,फिंगरप्रिंटवर होणार यूपीआय व्यवहार!

"एनपीसीआय"कडून डिजिटल पेमेंट्स इकोसिस्टम तंत्रज्ञानात क्रांती !
पेमेंट्स इकोसिस्टम तंत्रज्ञानात क्रांती
पेमेंट्स इकोसिस्टम तंत्रज्ञानात क्रांती
Published on

नवी दिल्ली: आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) व्यवहार बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारेही करता येणार आहेत. म्हणजेच, वापरकर्ते आता सहा-अंकी पिन टाकण्याऐवजी फक्त आपला चेहरा (Face ID) किंवा फिंगरप्रिंट (Fingerprint) वापरून व्यवहार प्रमाणित करू शकणार आहेत.याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) नुकतीच अधिकृतपणे घोषणा केली आहे. त्यामुळे डिजिटल व्यवहारांच्या जगात (NPCI)ने आणखी एक मोठी क्रांती घडवून आणली आहे.

एनपीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर ही माहिती दिली असून, या नव्या सुविधेमुळे यूपीआय व्यवहार अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहेत. तथापि, सध्याची पारंपरिक पद्धत म्हणजे पिन टाकून पेमेंट करण्याचा पर्यायही कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे कोणतीही प्रमाणीकरण पद्धत वापरण्याची मुभा मिळणार आहे.

यासोबतच एनपीसीआयने ‘यूपीआय मल्टी-सिग्नेटर (UPI Multi-Signator)’(व्यवहारासाठी एकाहून अधिक व्यक्तींची मंजुरी किंवा स्वाक्षरी) हे नवे वैशिष्ट्यही सुरू केले आहे. हे फीचर विशेषतः संयुक्त खात्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. आता अशा खात्यांमधून यूपीआय व्यवहार करताना एका किंवा अधिक स्वाक्षरीकर्त्यांकडून डिजिटल अधिकृतता घेता येणार आहे. त्यामुळे मल्टी-सिग्नेचर किंवा संयुक्त खातेधारकांसाठीही यूपीआय व्यवहार अधिक सुलभ होतील.

एनपीसीआयने आणखी एक अभिनव सुविधा — ‘UPI Light Smart Glasses’ — सादर केली आहे. या अत्याधुनिक स्मार्ट चष्म्यांच्या मदतीने वापरकर्ते आपल्या डोळ्यांसमोरच QR कोड स्कॅन करून ‘हँड्स-फ्री’ (हात न लावता) व्यवहार पूर्ण करू शकतात. वापरकर्त्यांना फक्त व्हॉइस कमांडद्वारे (केवळ आज्ञा देऊन) पेमेंट प्रमाणित करावे लागेल. यासाठी फोन काढण्याची किंवा पिन टाकण्याची गरज राहणार नाही. या नव्या तंत्रज्ञानामुळे व्यवहारांची सोय आणि गती दोन्ही वाढणार आहेत.

याशिवाय, एनपीसीआयने ‘UPI Cash Point’ ही संकल्पना कार्यान्वित केली आहे, यामुळे यूपीआयद्वारे रोख रक्कम काढणे किंवा जमा करणे शक्य होणार आहे. वापरकर्ते आता आपल्या यूपीआय ॲपचा वापर करून सहभागी दुकाने, फार्मसी किंवा बिझनेस कॉरस्पॉन्डंटकडून रोख रक्कम काढू किंवा जमा करू शकणार आहेत. ही दुकाने मिनी-एटीएमप्रमाणे कार्य करतील. ग्राहकांनी फक्त दुकानातील QR कोड स्कॅन करून व्यवहार पूर्ण करायचा आहे.

यूपीआयचा वापर सध्या प्रचंड प्रमाणात वाढलेला असताना, एनपीसीआयच्या या नव्या क्रांतीमुळे डिजिटल व्यवहार प्रणाली आणखी मजबूत आणि लोकाभिमुख होईलअशी अपेक्षा आहे.

दरम्यान, एनपीसीआयच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये यूपीआयद्वारे १,९६३.३४ कोटी व्यवहार झाले, ज्यांची एकूण रक्कम २४.८९ लाख कोटी रुपये होती. ही संख्या ऑगस्टच्या तुलनेत सुमारे १.८३ टक्क्यांनी कमी आहे. ऑगस्ट महिन्यात अंदाजे २००० कोटी व्यवहार नोंदले गेले होते, ज्यांची एकूण रक्कम २४.८५ लाख कोटी रुपये होती.

एनपीसीआयने बायोमेट्रिक प्रमाणीकरण, स्मार्ट वेअरेबल्स आणि कॅश पॉइंट सारख्या नव्या सुविधा सुरू करून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, भारतातील डिजिटल पेमेंट्स इकोसिस्टम तंत्रज्ञानाचे नवे क्षितिज निर्माण करीत आहे.

Banco News
www.banco.news